Join us  

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर एकाच व्यासपीठावर समोरासमोर या, होऊन जाऊ दे; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना उघड आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 4:43 PM

प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, एकाच व्यासपीठावर या समोरासमोर काय ते होऊन दाऊ देत माझी पूर्ण तयारी आहे, असं खुलं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

मुंबई-

प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, एकाच व्यासपीठावर या समोरासमोर काय ते होऊन दाऊ देत माझी पूर्ण तयारी आहे, असं खुलं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. ते मुंबईत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

"प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावं लागतंय. मैदानासाठी कोर्टात जा, उमेदवारीसाठी कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही याची तयारी करण्यापेक्षा एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊ आणि होऊन जाऊ देत काय व्हायचं ते", असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. 

फारुक अब्दुल्ला म्हणाले वडीलांसारखा लढकार्यक्रमाला फारुक अब्दुल्ला देखील उपस्थित होते. फारुक अब्दुल्ला आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करुन दिली. "फारुक अब्दुल्ला मला भेटले. त्यांची आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते आल्या आल्या मला म्हणाले अजिबात घाबरु नको वडिलांसारखा लढ. अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्यावेळी अनेक मोठी वादळं देखील शिवसेनेसोबत होती. आताच्याही वादळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी वादळं सोबत आहेत. वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत. वादळ असो, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे सोबत असताना मी तर लढाईच्याच क्षणाची वाट पाहातोय", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री असते"जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते", असं विधानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. "प्रत्येकाचंच वय वाढत असतं. पण बाळासाहेब सांगायचे वयानं माणूस मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो. त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसं आहे. नुसतं तरुण मनाचं असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इर्ष्या असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेछगन भुजबळएकनाथ शिंदे