हिंमत असेल, तर एक महिन्यात निवडणूक घ्या, ठाकरेंचं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:25 AM2022-09-22T09:25:09+5:302022-09-22T09:25:33+5:30
महापालिका निवडणूक आली की, या गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्क्वेअर फुटाने विकण्याची जागा आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या अन् आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करीत आहात, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दिले. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणूक आली की, या गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्क्वेअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती १०५ वीरांच्या बलिदानातून मिळविलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि या आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी सुनावले.
भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करून, या कमळाबाईचा मुंबईशी काय संबंध, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, यांच्याबरोबर युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली. आमच्यासोबत वाढले आणि आम्हालाच लाथा मारू लागले. आज माझ्या घराण्यावर बोलत आहेत, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? इतके उपरे घेतले की, ५२ कुळे आहेत की १५२ कुळे हेच समजत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
शिंदे मिंधे झाल्याची टीका
वेदांतबाबत धादांत खोटे बोलत आहात, धारावीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गेले. कोणाची बाजू घेऊन बोलत आहात? होय महाराजा, म्हणत दिल्लीचे मिंधे झाला आहात, असा हल्लाबोल ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. सगळे मिळून शिवसेनेला संपवायला निघाले आहेत, सोबत मुन्नाभाई (राज ठाकरे) घेतला आहे. शिवसैनिकांमध्येच रक्तपात घडवायचा अन् स्वत: साफ राहायचे, असे भाजपचे चालले आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.
बाप पळविणारी औलाद
‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असे वारंवार तुम्हाला का म्हणावे लागते, काही शंका आहे का, या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या विधानाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, आजवर मुले पळविणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळविणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही त्यांना सत्तेचे दूध पाजले, त्यांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे.
भाजपसोबत चला : खा.कीर्तिकर
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे ही शिवसेनेची चूक होती. भाजप आपला नैसर्गिक मित्र आहे. आपण भाजपसोबतच गेले पाहिजे, अशी भूमिका ठाकरे गटाचे मुंबईतील खासदार गजानन कीर्तीकर यांनी मेळाव्यापूर्वी मांडली. उद्धव यांची भेट घेऊन आपण ही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे गट हायकोर्टात
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे. शिवसेना व शिवसेनेचे सचिव अनिल परब यांनी ही याचिका दाखल केली आहे. १९६६ पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो आणि पालिकेने परवानगीही दिली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.