Join us

'हिंमत असेल तर छातीवर वार करा...', मिहीर कोटेचा यांचे संजय दिना पाटलांना खुले आव्हान

By मनीषा म्हात्रे | Published: April 30, 2024 9:42 PM

संजय दिना पाटील म्हणे नौटंकी थांबवा

मुंबई - मानखुर्द येथे प्रचार रॅलीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर पूर्वचे महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रतिस्पर्धी संजय पाटील यांच्यावर टीका करत खुले आव्हान दिले आहे. बुधवारी, १ मे, महाराष्ट्रदिनी मानखुर्द - शिवाजी नगर भागात खुला प्रचार करणार आहे. हिम्मत असेल तर छातीवर वार करा, पाठीवर नको. आणि या वेळेस नेम चकवू नका, असे आव्हान मिहीर कोटेचा यांनी दिले आहे. यावर उत्तर देताना, संजय पाटील यांनी "दगडफेक हे नौटंकी असून रडीचा खेळ बंद करून उमेदवाराने चांगल्या मार्गाने निवडणूक लढवावी अशी विनंती केली.

कोटेचा यांनी सांगितले, संजय पाटील यांनी मानखुर्द - शिवाजी नगरास गुन्हेगारांचा अड्डा बनविला आहे. या भागात मुंबईचे मिनी पाकिस्तान ते बनवू पाहत आहेत. या भ्याड हल्ल्यामागे संजय पाटील हे सूत्रधार आहेत, असा गंभीर आरोप कोटेचा यांनी केला आहे.

शिवाजी नगर मानखुर्द येथे सोमवारी संध्याकाळी  प्रचार फेरी न्यू गौतम नगरजवळ आली. तेव्हा गर्दीतून अज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथाच्या दिशेने विटेचा तुकडा भिरकावला. त्यांच्यासोबत रथावर उभ्या भाजप सचिव आणि ईशान्य मुंबईच्या निवडणूक प्रभारी निहारीका खोंदले यांच्या मानेवर विटेचा तुकडा बसला. तोच खोंदले यांच्या मागे उभे भाजप पदाधिकारी कनप्पा गुनाळे यांच्या चेहेऱ्यावर आदळला. याप्रकरणी रात्री उशिराने अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवत देवनार पोलीस अधिक तपास करत आहे. 

पोलीस बंदोबस्त अपुरा

तीन ते चार दिवसांपूर्वी परवानगी घेऊनही मानखुर्द - शिवाजी नगर येथील महायुतीच्या प्रचार फेऱ्यांना स्थानिक पोलीस पुरेसा बंदोबस्त पुरवत नाहीत, अशी तक्रार येथील भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत.

रडीचा खेळ थांबवा...

त्यांची सत्ता, सरकार आहे. चांगला बंदोबस्त घेत प्रचार करावा. सर्वांना माहिती आहे हे नौटंकी सुरू आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून उमेदवार रडीचा खेळ खेळत आहे. असे रडगाणे थांबवून चांगल्या प्रकारे निवडणूक लढा.  - संजय दिना पाटील, महाविकास आघाडी उमेदवार

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मिहिर कोटेचाभाजपाकाँग्रेस