Join us  

रेल्वेत रील्स कराल, तर तुरुंगाची हवा खावी लागेल ! प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नजर ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:31 AM

गेल्या काही दिवसात रेल्वेत रील्स करणे, सेल्फी काढणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे सातत्याने दिसून येते.

मुंबई  :  गेल्या काही दिवसात रेल्वेत रील्स करणे, सेल्फी काढणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे सातत्याने दिसून येते. विशेषतः धावत्या रेल्वेतही रील्स केले जात आहेत. परंतु असे रील्स  किंवा व्हिडीओमुळे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.  

नुकताच धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काही प्रवाशांनी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रेल्वेने असे व्हिडीओ काढणाऱ्यावर नजर ठेवणे सुरू ठेवले आहे.

दंड आणि तुरुंगवास

  धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे, रील्स बनविणे किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार दोषी मानले जाते.

  ज्या अंतर्गत किमान एक हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे.

  त्याच वेळी, जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या काठावर पिवळी लाइन ओलांडली तर ५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

  त्याचबरोबर तुम्हाला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

  रेल्वे कायद्याच्या कलम १४७ नुसार रेल्वे रुळ ओलांडणे हा देखील गुन्हा आहे.

धावत्या लोकलमध्ये असे व्हिडीओ काढण्यास बंदी आहे. रेल्वे प्रवाशांना आवाहन आहे की, रेल्वे गाड्यात आणि रेल्वे परिसरात असे डान्स करून त्यांचे चित्रीकरण करू नयेत, अन्यथा रेल्वेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- डॉ. शिवराज मानसपुरे,

मुख्य जनसंपर्क अधिकारी

दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

  रेल्वे सुरक्षा दलाकडून अशा चित्रीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहे.

  विशेष म्हणजे सर्वप्रथम सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

  तसेच धावत्या रेल्वे गाड्यात किंवा रेल्वे परिसरात असे व्हिडीओ करणाऱ्यांवर नजर अणार आहे.

  दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे.