बिल भरा नाहीतर तुमची लाइट कापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:06 AM2021-03-14T04:06:02+5:302021-03-14T04:06:02+5:30
भांडुप परिमंडळात कारवाई सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भांडुप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती, पाणीपुरवठा, स्ट्रीट ...
भांडुप परिमंडळात कारवाई सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडुप परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाइट तसेच सार्वजनिक विभागाकडे वीजबिलाची थकबाकी १०६८.९ कोटी रुपयांची आहे. कोरोना काळातील थकबाकीमुळे हा आकडा वाढला असून, वसुलीची धडक मोहीम परिमंडळाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. शिवाय ज्या ग्राहकांनी वीजबिल भरले नाही, त्यांची वीजजोडणी तोडण्याचे आदेश देण्यात आले असून, वीजजोडणी तोडण्याचे काम सुरू झाले आहे.
महावितरणच्या घरगुती ग्राहकांची एकूण थकबाकी ७१ हजार ५०६ कोटींवर आली असून, महावितरणवर ४६ हजार ६५९ कोटी रुपयांचे कर्जही आहे. त्यामुळे वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीजजोडणी खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १२ मार्चपासून पुन्हा वीजजोडणी तोडण्याचे काम सुरू झाले आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडळात उच्चदाबातील ग्राहकांकडे २८७.६ कोटींची थकबाकी आहे. ज्यामध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, ग्राहकांकडे २५७.८५ कोटी, इतर ग्राहकांकडे २५.२९ कोटी, पाणीपुरवठा योजनांकडे ४.४६ कोटी तर, कृषी ग्राहकांकडे ०.०१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
लघुदाबातील ग्राहकांकडे ७८१.३ कोटींची थकबाकी आहे. यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांकडे ५६२.९३ कोटी, इतर ग्राहकांकडे १५.४२ कोटी, पाणीपुरवठा योजनांकडे ८.६८ कोटी, स्ट्रीट लाइट १८९.६६ कोटी, कृषी ग्राहकांकडे ४.६१ कोटी, अशा प्रकारे उच्चदाब व लघुदाब मिळून एकूण १०६८.९ कोटींची थकबाकी भांडुप परिमंडळात आहे.
...............................................