अंधेरीतील हॉटेलने लाच मागितल्याचा आरोप; तरुणीने व्हिडिओ केला व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आफ्रिकेतून भारतात परतलेल्या एका तरुणाकडे क्वॉरण्टाइन न होण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप त्याच्या बहिणीने नामांकित हॉटेल व्यवस्थापनावर केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत चौकशी सुरू आहे.
तरुणीने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा भाऊ आफ्रिकेतून भारतात परतला. त्याची दोन वेळा केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊनही अंधेरी पूर्व येथील हॉटेलमध्ये त्याला नेऊन त्याचा पासपोर्ट बळजबरीने काढून घेऊन नंतर त्याला क्वॉरण्टाइन होण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने नकार दिल्यावर तुम्हाला क्वॉरण्टाइन व्हायचे नसेल तर तुम्ही दहा हजार रुपये द्या व घरी जा, असे सांगण्यात आल्याचे तरुणीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सदर हॉटेल हे एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येत असून, पालिकेचे काही कर्मचारी त्याठिकाणी आले असून, याबाबत मी माहिती घेत आहे, असे परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त एम. रेड्डी यांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी मात्र एमआयडीसी पोलिसांना मेसेज आणि फोन करूनही त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.