Join us  

चुकीची पीयूसी काढाल, तर होईल दहा हजारांचा दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:33 AM

मुंबईत होणाऱ्या वायुप्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर यंत्रणा जलदगतीने कामाला लागल्या आहेत. 

मुंबई :

मुंबईत होणाऱ्या वायुप्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर यंत्रणा जलदगतीने कामाला लागल्या आहेत. 

परिवहन विभागही आपली कारवाई आणखी सक्त करणार असून, वाहनचालकांची पीयूसी तपासणी केली जाणार आहे. दोषी वाहनचालकांना दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.

मुंबईत मालवाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला माल आच्छादित करण्यात येत नाही, असे आढळले आहे. 

विशेष तपासणी मोहीमभारक्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मालाची खडी, सिमेंट, वीट, डबर, वाळू, इत्यादी वाहतूक तसेच ट्रान्झिट मिक्सरद्वारे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील आरटीओ कार्यालयांना दिले होते. परंतु वायुप्रदूषणाबाबत न्यायालयाने सुनावल्यानंतर परिवहन विभागाकडून आणखी कारवाई केली जात आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम तरतुदीनुसार मान्यताप्राप्त वायुप्रदूषण तपासणी केंद्रांकडून वाहनाची वायुप्रदूषणविषयक तपासणी करून प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.

विमा नाकारला जाऊ शकतोपीयूसी नसल्यास विमा नाकारला जाऊ शकतो. एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहनमालकाकडे वाहन धूर तपासणी (पीयूसी) प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो.

यांच्यावर होणार कारवाई? प्रदूषण रोखण्यासाठी वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक असते. मोटारसायकल किंवा कारचालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ज्या वाहनचालकांकडे हे सर्टिफिकेट नसेल, त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो.

पीयूसी केंद्राचीही चौकशीपीयूसी केंद्रे चालवण्यात येतात. त्यांना परिवहन विभागाकडून परवानगी देण्यात येते. मात्र सदरच्या पीयूसी सेंटरमधून प्रदूषण प्रमाणपत्र देताना योग्य रीतीने वाहनांची तपासणी केली जाते. याबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. यामुळे आरटीओकडून पीयूसी सेंटरचीही चौकशी करण्यात येणार आहे.