ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:13 AM2023-06-02T11:13:11+5:302023-06-02T11:13:17+5:30
बदलत्या जीवनशैलीत दारूच्या व्यसनाला आहारी पडलेल्यांची संख्या वाढत आहे.
मुंबई : बदलत्या जीवनशैलीत दारूच्या व्यसनाला आहारी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात दारूबाबत अनेक चुकीचे समज बाळगून पिणारे खूप आहेत. मात्र, ढाबा, हॉटेलात बेकायदा दारू पिताना आढळल्यास कोर्टाची पायरीही चढावी लागते.
उल्लंघन केल्यास कारवाई!
शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप आहे. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते.
दारूच्या किमतीपेक्षा दंड जास्त
ढाबा, हॉटेलमध्ये दारू पिणे बेकायदा आहे. कायद्याचे उल्लंघन करून अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई होते. तेव्हा ग्राहकाने घेतलेल्या दारूच्या बाटल्या, दारूच्या किमतीपेक्षा जास्त मोठ्या रकमेची कारवाई त्यांच्यावर केली जाते. ढाबा मालकाला दारूच्या किमतीपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे उत्पादन विभागाची कारवाई बेकायदा दारू विकणाऱ्या ढाब्यावाल्याला महाग पडते.
छुप्या मार्गाने हॉटेल, ढाब्यावर दारू विक्री करणाऱ्यांकडून भेसळयुक्त दारू विकली जाण्याची शक्यता जास्त असते. अनेक गैरप्रकार होत असतात. तेव्हा परवानाशिवाय दारू विकणाऱ्या हॉटेल, ढाब्यांवर कारवाई केली जाते, असे मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.
ढाबा मालकावरही कारवाई
परवाना नसताना ढाबा, हॉटेलमध्ये दारू विक्रीस ठेवणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, सोबत इतर गोष्टी पुरविणे अशा गोष्टी करणाऱ्या ढाबा, हॉटेलवरही कारवाई केली जाते.