संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:38 AM2024-10-23T06:38:02+5:302024-10-23T06:38:58+5:30
मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी; गाड्यांची कसून तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांनी चोख जबाबदारी पार पाडावी. त्यासाठी पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, तस्करी, तसेच हवाला आदी संशयास्पद प्रकरणांत कोणतीही हयगय न करता थेट व तात्काळ जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणूक अनुषंगाने संबंधित यंत्रणांची महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व यंत्रणांकडून निवडणुकीबाबतचे नियोजन, तसेच सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
सीमेवर लक्ष ठेवा
सर्व यंत्रणांनी संयुक्त पथकांची निर्मिती करून त्यांची मुंबईतील ‘चेक पोस्ट’वर नियुक्ती करावी. मुंबईच्या सीमेवर, समुद्र किनाऱ्यांवर, विमानतळ तसेच वाहतुकीच्या अन्य मार्गांवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून संशयास्पद प्रकरणांमध्ये तत्काळ कारवाई करावी. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ‘नॉन शेड्यूल्ड फ्लाइट्स’ संदर्भातील माहिती मुंबई पोलिस तसेच आयकर विभागाला नियमितपणे द्यावी, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावे, असेही गगराणी यांनी यावेळी यंत्रणांना सांगितले.
कोणाला मिळाल्या सूचना?
पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सक्तवसुली, महसूल गुप्तवार्ता, केंद्रीय व राज्य वस्तू व सेवा कर, सीमा शुल्क, अमली पदार्थ नियंत्रण, वित्तीय गुप्तवार्ता विभाग, तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तटरक्षक दल, रेल्वे सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण सुरक्षा, परिवहन विभाग, आचारसंहिता कक्ष, मुंबई पोलिस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभाग, राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी असून गाड्यांमधून रोख रक्कम नेली जात आहे की नाही याची तपासणी पोलिस करत आहेत.