मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली. त्यानंतर, भाजपा आमदार आणि नेते आक्रमक झाले असून त्यांनी मनोज जरांगेंचा निषेध व्यक्त केला. तर, जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. त्यानुसार, विधानसभेत केलेल्या मागणीनंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. त्यावरुन, राजकीय वाद रंगला आहे. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. तसेच, नितेश राणेंवर अद्याप एसआयटी का नाही, असा सवालही उपस्थित केला.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. सभागृहात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन गोंधळ पाहायला मिळाला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणाऱ्या व्हिडिओ प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांची चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी केली. त्यावरुन, आता चांगलंच राजकारण तापलं असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अद्याप आमदार नितेश राणेंवर का गुन्हा दाखल झाला नाही असे म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदा रास्तारोको प्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. मात्र, जरांगे यांनी फडणवीसांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच हा गुन्हा दाखल झाल्याने यामागे राजकारण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच, सुषमा अंधारे यांनी टीका टिपण्णीवरुन गुन्हा दाखल होत असेल तर अद्याप नितेश राणेंवर गुन्हा का दाखल नाही, असा सवाल केला आहे.
"टीका टिप्पणी करताना शिवीगाळीचे समर्थन कुणीही करणार नाही. पण, मग हाच निकष लावायचा असेल तर नितेश राणेवर अजून गुन्हे दाखल का केले नाही ?", असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी जाहीर सभेत बोलताना पोलिसांची खिल्ली उडवली होती. तर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवरही ते शिवराळ भाषेत टीका करतात. त्यामुळे, त्यांच्यावर अद्याप का गुन्हा दाखल झाला नाही, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.