Join us

हिंमत असेल तर समोर येऊन लढा, पदराआडून राजकारण कशाला?; राऊतांचा भाजपवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 1:57 AM

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबाेल

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाजपची नोव्हेंबरची डेडलाईन उलटून गेली, तरी सरकार पडले नाही. त्यामुळे सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम ईडी मार्फत केले जात आहे. राज्यातील सरकार पाडता येत नसल्याने सरकारच्या खंद्या समर्थकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तुम्ही नोटीस पाठवा किंवा अटक करा, या सरकारचा बालही बाका होणार नाही. मात्र, बायकांच्या पदराआडून राजकारण करण्याची तुमची खेळी तुमच्यावरच उलटल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

‘मला तोंड उघडायला लावू नका. मी तोंड उघडले तर केंद्राच्या सत्तेला हादरे बसतील. तुमचे उद्योग, तुमच्या मुलाबाळांचे हिशोब माझ्याकडे आहेत. पण कुटुंबापर्यंत जाण्याची आमची संस्कृती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुणाच्या कुटुंबापर्यंत न जाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु तुम्ही बायका-पोरांना यात आणत असाल तर तुमचे वस्त्रहरण करावेच लागेल’, असा इशाराही राऊत यांनी दिला. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स बजावले आहे. याबाबत राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सक्त वसुलीसंचालनालय अर्थात ईडीने दीड महिन्यांपासून आमच्याशी पत्रव्यवहार करीत आहे. त्यांनी जी माहिती मागितली ती आम्ही दिली. 

चौकशीच्या नोटीसीत पीएमसी बँकेचा कोणताही उल्लेख नाही. मग, भाजपची माकडं पीएमसी बँकेचा मुद्दा का लावून धरत आहेत, पीएमसी बँकेप्रकरणी चौकशी होणार असल्याचे यांना कोणी सांगितले, ईडीने भाजपच्या कार्यालयात स्वतःचे कार्यालय थाटले आहे का, असा सवालही त्यांनी केला.

माझ्या पत्नीने तिच्या मैत्रीणीच्या मदतीने घर घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ईडीने आता नोटीस पाठवली आहे. भाजपचे तीन लोक सतत ईडी कार्यालयात जात आहेत. तिथून कागदपत्रे घेऊन येत आहे.    - खा. संजय राऊत, शिवसेना नेते 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालय