हिंमत असेल तर तिघेही एकत्र लढायला या, सिंधुदुर्ग निकालानंतर शेलारांचे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:51 PM2021-12-31T17:51:21+5:302021-12-31T18:16:01+5:30
सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे.
मुंबई - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाच्या राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून नारायण राणे यांचं या विजयासाठी अभिनंदन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचं अभिनंदन करताना महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. त्यानंतर, भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडीचा भोपळा का फुटला हे सांगितलंय. तसेच, ही आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण तसेच सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यानंतर, अॅड. आशिष शेलार यांनीही ट्विट करुन ही आगामी मुंबई महापालिका निवडणूक निकालाची नांदी असल्याचं म्हटलंय.
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान् आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो. नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमित शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला, या आम्ही तयार आहोत, असे चॅलेंजच आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला दिलंय.
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2021
विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो...
नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे.
मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!
चंद्रकांत पाटील यांनीही केली टीका
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या विजयासाठी नारायण राणेंचे अभिनंदन करत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयासाठी मी नारायण राणे, राजन तेली, नितेश राणे या सर्वांचं अभिनंदन करतो. सहकारामध्ये भाजपा काहीसा मागे होता. मात्र गेल्या काही काळात ही कसर भरून निघत आहे. सिंधुदुर्गात मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे. शिवसेनेला कोकणाच्या जोरावर महाराष्ट्रात राजकारण करण्याची सवय आहे. मात्र, कोकणातला बेस आता सुटू लागल्याने ते हमरीतुमरीवर आले आहेत. तीन चाकी रिक्षा ही महाविकास आघाडीच्या पॅनेलची या निवडणुकीतील निशाणी होती. मात्र ही तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर झाली, हे या निवडणुकीत दिसून आलं. आता सगळीकडेच ही तीन चाकी रिक्षा पंक्चर होणार आहे, असे भाकितही चंद्रकांत पाटील यांनी केलं.
दरम्यान, वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत.