म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला नसेल तर आता तरी भरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:52 AM2023-10-17T10:52:15+5:302023-10-17T10:52:21+5:30
म्हाडा : ५ हजार ३११ घरांसाठी अर्ज करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५ हजार ३११ घरांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेणाऱ्या अर्जदारांना लवकरच स्वीकृती पत्र ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे.
या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत सहभाग घेणाऱ्या अर्जदारांना मंडळातर्फे लवकरच स्वीकृतीपत्र ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतील. या योजनेंतर्गत २२७८ सदनिकांकरिता ४५० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी सदनिकेच्या रकमेचा भरणा केल्यानंतर लाभार्थ्यांना तातडीने घरांचा ताबा देण्याचे नियोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
१५ नोव्हेंबर रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतवाढ
१७ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती
१७ नोव्हेंबर रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध
सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक असून यामध्ये मानवी हस्तक्षेपास कोणत्याही प्रकारे वाव नाही. करिता या घरांच्या विक्रीकरिता कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका. मंडळाने कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजंट, त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्ती नेमलेले नाहीत. गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही.
- मारोती मोरे, मुख्य अधिकारी, कोंकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ