Join us  

सर्दी, खोकला, तापाकडे दुर्लक्ष कराल तर... संसर्गजन्य आजार घालेल विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 2:11 PM

गेल्या महिन्यांत या आजाराचे ३११ रुग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वाइन फ्लू आपल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून असून दरवर्षी कमी- अधिक प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळतात. इन्फ्लुएंझा टाईप ए च्या एच १ एन १ या विषाणूमुळे हा आजार होत असून हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाच्या आजरासारखीच लक्षणे असलेला हा आजार आहे. त्यामुळे या दोन आजरांमध्ये डॉक्टरांना नेमका कोणता आजार हे पाहण्यासाठी चाचणी करून पाहावे लागते. गेल्या महिन्यांत या आजाराचे ३११ रुग्ण आढळले. हवामानात बदल झाल्यामुळे या विषाणूची लागण रुग्णांना होते. सर्दी, खोकला, ताप ही सर्वसाधारपणे दिसणारी लक्षणे स्वाईन फ्लूची असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सर्व माहिती नागरिकांना यापूर्वीच माहिती आहे. त्याच पद्धतीने स्वाईन फ्लूचाही बचाव करता येऊ शकतो. हा आजार संसर्जन्य असल्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे सांगितले जाते. मात्र नागरिक मास्क वापरण्याच्या सवयीला कंटाळून गेले आहेत. या आजराची लक्षणे इतकी सामान्य आहेत की तो आजार होऊन गेला तरी कळत नाही.

  • ३११ सहा महिन्यांतील स्वाईन फ्लूचे रुग्ण
  • लक्षणे- ताप, थंडी वाजणे, सर्दी आणि घसादुखी. अंगदुखी, डोकेदुखी, थकवा येणे

- जोपर्यंत या आजाराची चाचणी करून निदान केले जात नाही तो पर्यंत हा आजार झाला आहे की नाही ते कळत नाही.- ‘स्वाईन फ्लू’ ची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने, सर्दीने हा आजार इतर रुग्णांमध्ये पसरत असतो. - या आजराचे विषाणू श्वसनलिकेद्वारे शरीरात जाऊन फुफ्फुसांवर हल्ला करतात. त्यामुळे केव्हा तरी रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लूच्या आजराला नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मोठ्या प्रमाणात शहरात बांधकामे सुरु आहे, धूळ आहे. तसेच हवामानात बदल झाल्यामुळे नागरिकांना सर्दी खोकला होतो. त्यासाठी नागरिकांनी लक्षणानुसार उपचार घ्यावेत, मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. -डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय

टॅग्स :मुंबई