बालमजूर ठेवाल तर कोठडीची हवा खाल

By admin | Published: September 25, 2015 02:30 AM2015-09-25T02:30:25+5:302015-09-25T02:30:25+5:30

कमी मोबदल्यात लहान मुलांना राबविणाऱ्या मालकांनो सावधान...बालमजुरीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाई गेल्या सहा महिन्यात १०० मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे

If you keep child labor, then the air of the bath | बालमजूर ठेवाल तर कोठडीची हवा खाल

बालमजूर ठेवाल तर कोठडीची हवा खाल

Next

मनीषा म्हात्रे, मुंबई
कमी मोबदल्यात लहान मुलांना राबविणाऱ्या मालकांनो सावधान...बालमजुरीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाई गेल्या सहा महिन्यात १०० मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे. बालमजुरी प्रतिबंधक कायदा अधिक कठोर केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये २० सप्टेंबरपर्यंत ७९८ बालकांची सुटका करण्यास अंमलबजावणी विभागाला यश आले.
बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यासह नेपाळमधून येणाऱ्या बालमजुरांची संख्या अधिक असून अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ते मुंबईत काम करतात. कमी वेतनामध्ये त्यांच्याकडून १२-१२ तास मजुरी करुन घेतली जाते. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले तब्बल ४ हजार बालमजुर मुंबईच्या विविध भागांमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. चेंबुर शिवाजी नगर, गोवंडी, धारावी, सायन, भांडुप सोनापुर, साकीनाका या परिसरांमध्ये चालणारे कपडा व्यवसाय, चर्मोद्योग, हॉटेल व्यवसायामध्ये बाल मजुरांची संख्या अधिक आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी घातली तरी मालक मंडळी कमी मोबदल्यात त्यांना राबवून फायदा घेतात. त्यात बालमजुरीचा कायदाही जामीनपात्र असल्याने या मालकांचे फावत होते.
त्यात अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त प्रवीण पाटील यांनी बालमजुरीचे गांभीर्य जाणून यामध्ये कठोर कारवाईसाठी प्रयत्न सुरु केले. मार्च २०१५ मध्ये या कायद्यात शासनाने सुधारणा करुन ३७० (१) कलमाचा समावेश केला. हे कलम अजामीनपात्र असून त्यात किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यात जामिनावर सुटण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मालकांना किमान दोन ते तीन महिने पोलीस कोठडीची हवा खावी लागते. हा कायदा लागू झाल्यापासून २० सप्टेंबरपर्यंत तब्बल १०० मालकांवर या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक कारवाई यंदा अंमलबजावणी पथकाकडून करण्यात आली आहे. त्यात ३४८ गुन्हे दाखल झाले असून ४९७ मालकांना अटक करुन ७९८ बालकामगार मुक्त करण्यात आले आहे.

Web Title: If you keep child labor, then the air of the bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.