मुंबई - इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. महाविकास आघाडीकडून या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी अजित पवार गटावर टीका करताना गंभीर आरोप केले. शरद पवार यांच्याविरोधात भाजप लिहून देईल, तसे अजित पवार बोलतात, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच, सामनाच्या अग्रलेखातून अजित दादांचा विकास, अशा मथळ्याखाली त्यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिल्यानंतर राऊत यांनी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांना थेट इशारा दिलाय.
एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचे असेल तर त्यांना लिहून दिले जाते. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचे असेल, लिहायचे असेल तर तेही त्यांना लिहून दिले जाते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना लक्ष्य केलं.
जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत, असे राऊत यांनी म्हटले होते. त्यावर, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक अध्यक्षांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा पलटवार करण्यात आला. यासंदर्भात राऊत यांना विचारले असता, मला धमक्या देऊ नका, मी लोटांगण घालणार माणूस नाही, असे म्हणत थेट इशारा दिला.
मी कधीही खालच्या भाषेत टीका केली नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. आजच्या अग्रलेखामध्ये खालच्या पातळीचं काय वाक्य आहे, हे कुणी मला दाखवलं तर मी राजकारण सोडतो, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले. पक्ष फोडणाऱ्या बेईमान लोकांना तुम्ही निधी देता आणि जे प्रामाणिक आहेत त्यांना निधी देत नाहीत. निधी हवा असेल तर आमच्या गटात या, असे म्हणता. मला धमक्या देऊ नका. मी डरपोक नाही. एजन्सीला घाबरुन गुडघे टेकणार माणूस मी नाही. मी पळपुटा नाही, माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाहीत त्यांच्या अशा शब्दात राऊत यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला.