कुलदीप घायवट
मुंबई : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूशी लढाई सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर सर्व यंत्रणेचा भर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून समाज माध्यमावरून कोरोना विषाणूबाबत अद्ययावत माहिती दिली जात आहे. ही माहिती मुख्यमंत्री मराठीतून बोलून, लिहून देत आहेत. हे अनेक इतर भाषिकांना खटकत आहे. त्यामुळे इतर भाषिकांकडून मुख्यमंत्र्यावर टीका करून हिंदी भाषेचा वापर करण्याचा सल्ला समाज माध्यमावरून दिला जातोय. मात्र, महाराष्ट्रात राहताय, तर मराठी भाषा यायलाच पाहिजे, असे आवाहन मराठी भाषाप्रेमींकडून केले जात आहे.
कोरोनाचे संकट लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा इतर कोणाकडून फेसबुक, ट्विटरवर एखादी पोस्ट टाकली किंवा व्हिडिओ टाकला, कि लगेच हिंदी भाषा बोलावी, मराठी समजत नाही, असे सल्ले इतर भाषिकांकडून दिले जात आहेत. यासह मराठी माणसाबद्दल विकृत भाष्य समाज माध्यमावरून केले जातेय. कोरोनासारख्या गंभीर स्थितीतही इतर भाषिकांना मराठी समजून घ्यायची नाही. मुख्यमंत्र्यांनी हिंदीतच बोलावे, असे त्यांना वाटते.
मुख्यमंत्र्यांकडून मराठी भाषेचा वापर केला जातो. मात्र काहीचा यावर आक्षेप घेतला जात आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे. अनेक ठिकाणी त्रिभाषा सूत्राच्या नावावर हिंदी वापरली जाते. त्यामुळे लोकांना हिंदी समजते म्हणून मराठीची गरज नाही, असे म्हणून मराठी पूर्णच वगळली जाते. त्यामुळे मराठीची गळचेपी होऊ नये आणि राज्यभाषा म्हणून तिला योग्य मान मिळावा. यासाठी मागील सात वर्षांपासून #मराठीबोलाचळवळ समाज माध्यमावरून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया मराठी बोला चळवळचे कार्यकर्ते चंदन तहसीलदार यांनी दिली.
--------------------------------------
समाज माध्यमावर #महाराष्ट्रातफक्तमराठीच, #मराठीबोलाचळवळ, #महाराष्ट्रातमराठीच असे हॅशटॅग वापरून मराठी भाषेविषयी जागृती केली जात आहे.
--------------------------------------