पुन्हा जर आमच्या माता-भगिनींवर हात उचलाल तर..; उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:10 PM2023-06-18T17:10:38+5:302023-06-18T17:13:11+5:30
अयोध्या पौळ यांनी कालच मारहाणप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई - राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटातील वादानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे. अयोध्या पौळ यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: अयोध्या पौळ हिचा सत्कार केला. तसेच, महिला भगिनींवर हात टाकणाऱ्यांना इशाराही दिला.
अयोध्या पौळ यांनी कालच मारहाणप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या राज्यव्यापी पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं आगमन होताच, त्यांच्याकडे सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ हिचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात बोलतानाही उद्धव ठाकरेंनी अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. तसेच, ठाणे येथील शिंदे नावाच्या महिला भगिनीवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख त्यांनी केला. आता, महिला गुंड तयार झाले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाला इशाराच दिला आहे.
यापुढे आमच्या महिला भगिंनींवर हात उचलाल तर पुन्हा ते हात दिसणार नाहीत, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना मिंधे म्हटले. तर, मणीपूर जळत असताना पंतप्रधान अमेरिकेला जात आहेत, असे म्हणत मणीपूरमध्ये ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पाठवा, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी केंद्रीय भाजपला आणि मोदी सरकारला दिले आहे.
संजय राऊतांनी दिली होती प्रतिक्रिया
संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात विरोधी पक्षात आहे म्हणून एका महिलेवर हल्ला झाला आहे. पोलीस काय करात आहेत. पोलीस आयुक्तांना सवाल आहे. हीच का तुमच्या शहरातील महिलांची सुरक्षा. अयोध्या पौळ ही आमच्या महिला आघाडीची कार्यकर्ती आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. म्हणूनच तिला फसवून एका कार्यक्रमाला बोलावलं आणि तिथे तिच्यावर हल्ला झाला. याला डरपोकपणा म्हणतात, हिंमत असेल तर समोरासमोर या, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
म्हणून मी कार्यक्रमाला गेले - पौळ
अयोध्या पौळ यांनी सांगितले की, मनीषा चरडे नावाच्या महिलेने मला ८ जून रोजी व्हॉट्सअॅपवर निमंत्रण पाठवलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला. त्यामध्ये त्यांनी निमंत्रणामध्ये माझा समाजसेविका आणि सौ. असा उल्लेख केला होता. त्यावरून मी त्यांना काही सुधारणा सूचवल्या. मी फोनवर बोलताना त्यांचा परिचय विचारला. तेव्हा त्यांनी मी शिवसेनेची पदाधिकारी आहे, अशी ओळख सांगितली. माझा नंबर तुम्हाला कुणी दिला असं विचारलं असता त्यांनी मला केदार दिघेंचं नाव सांगितलं. मी म्हटलं ठिक आहे.