मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक विधान, त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक आणि जामिनावर सुटका यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. एकीकडे सामनामधून नारायण राणेंवर जबरी टीका झाल्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर तितक्याच आक्रमक भाषेत बोचरे उत्तर दिले होते. राणे विरुद्ध शिवसेना या वादात संजय राऊत यांच्यावरही सातत्याने प्रहार होत आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी आणि मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर, शिवसेना नेत्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. त्यासंदर्भातच, भाजपाने ईडीची ससेमिरा शिवसेना नेत्यांच्या पाठिमागे लावल्याच्या आरोपासंदर्भात लोकमतने नितेश राणे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ''बाजारात असे खूप लोकं भेटतील. जे तुमच्यासाठी ट्विट करतील, तुमच्यासाठी लोमटेगिरी करतील, पैसे फेकल्यास बाजारात संजय राऊतांसारखे खूप लोकं मिळतात. पैसा फेको तमाशा देखो अशी ती व्यक्ती आहे,'' असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जबरी टीका केलीय.
राणेंच्या अग्रलेखावरुनही केला प्रहार
नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरेंच्या मिठाला जागतो हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल यांनी काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे.
राणेंच्या पाठिशी भाजप
दरम्यान, एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिल्याचे दिसून आले. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे.