...तर आपण कपाळकरंटे ठरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:08 AM2017-08-14T05:08:42+5:302017-08-14T05:08:45+5:30
सर्वांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाºया लोकमान्य टिळकांचा विसर पडल्याच्या बातम्या पुण्यातून ऐकायला येत आहेत
मुंबई : सर्वांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाºया लोकमान्य टिळकांचा विसर पडल्याच्या बातम्या पुण्यातून ऐकायला येत आहेत. गणेशोत्सवाच्या लोगोत लोकमान्य टिळकांना स्थान नाही, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. ज्या लोकमान्यांनी या उत्सवाची चळवळ केली, त्या लोकमान्यांनाच आपण विसरलो तर आपण कपाळकरंटे ठरू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
विलेपार्ले येथे साप्ताहिक ‘मार्मिक’च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या लोकांना आपण निवडून दिले तेच आता असे वागत आहेत. त्यांनी गणेशोत्सवाच्या लोगोमध्ये थेट लोकमान्य टिळकांचा चेहरा झाकण्याचे धाडस केले आहे. त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा तर दूरच राहिल्या, पण त्यांच्याकडूनच हा कपाळकरंटेपणा होतोय, अशी टीका उद्धव यांनी केली.
वंदे मातरम्वरून सुरू असलेल्या वादावरून उद्धव यांनी भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडले. याचबरोबर विधानसभेतसुद्धा ‘इस देश में रहेना होगा तो वंदे मातरम् कहेना होगा,’ असे सांगितले. पण तेथेच नाकावर टिच्चून अबू आझमी यांनी ‘देशातून हाकलले तरी चालेल, वंदे मातरम् म्हणणार नाही’ असे सांगितले. तरीही आपण काही करू शकलो नाही. देशभक्तीचे प्रेम थोतांड असता कामा नये. त्यामुळे काही करायचे असले तर कायदा करा, असेही उद्धव यांनी नमूद केले.
>राष्ट्रगीत म्हणावेच लागेल
येत्या १५ आॅगस्टला उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये देशभक्तीची परीक्षा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी फतवा काढला आहे. पण तिथल्या संघटनांनी झेंडावंदन करू, पण राष्ट्रगीत म्हणणार नाही असा फतवा काढला आहे. जर आमच्या देशाचा झेंडा फडकवणार असाल तर आमच्या देशाचे राष्ट्रगीत म्हणावेच लागेल, असे उद्धव यांनी उत्तर प्रदेशातील परिस्थितीबाबत स्पष्ट केले.