लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जामनगर आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केंद्रामध्ये झालेल्या कोळशाच्या अदलाबदलीच्या फायद्यातील हिस्सा हवा असेल, तर महावितरणला जामनगरच्या अदानीविरुद्ध केंद्रीय वीज नियामक आयोगाकडे धाव घ्यावी लागणार आहे. कारण हा फायदा महाराष्ट्रातील अदानींच्या वीजनिर्मिती केंद्राला झाला नसून, तो महाराष्ट्राबाहेरील अदानीच्या वीजनिर्मिती केंद्राला झाला आहे. त्यामुळे जामनगरमधील अदानींच्या वीजनिर्मिती केंद्राविरुद्ध महावितरणला केंद्राकडे धाव घ्यावी लागणार आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. दुसरीकडे वाहून आणलेल्या कोळशामुळे अदानींच्या वाढीव वीजदराचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार नाही, असे निर्देश आयोगाने देऊन वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे.
कोळशाच्या अदलाबदलीत आयात केलेल्या कोळाशासोबत वाहतुकीचा खर्च पकडून सदर रक्कम अदानी पॉवरला द्यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दिले होते. मात्र, यावर महावितरणने आक्षेप घेत आयात केलेल्या कोळशावर वाहतूक खर्चाची किंमत बरोबर नव्हती, असा मुद्दा मांडल्याचे वीज क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले. आयात केलेल्या कोळशाचा अतिरिक्त खर्च अदानी पॉवरला पाहिजे असेल तर त्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे यावे लागेल. मात्र, कोळशाच्या अदलाबदलीत झालेल्या फायद्यातील हिस्सा महावितरणला हवा असेल तर महावितरणला केंद्राकडे जावे लागेल. कारण फायदा हा जामनगरला झाला आहे. या फायद्यामधील भाग महावितरणला हवा असेल तर त्यांना केंद्र वीज नियामक आयोगाकडे धाव घ्यावी लागेल. कारण कोळशाचा अदलाबदलीचा फायदा महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केंद्राला झाला नसून, जामनगरमधील केंद्राला झाला आहे.
दुसरीकडे तिरोडा येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अदानी यांनी दहेज बंदरातून कोळसा खरेदी केला. दहेजमधून कोळसा खरेदी केल्याने दहेज ते तिरोडा वाहतुकीचा खर्च ५०० रुपये प्रति मेट्रिक टन वाढतो. याचा भुर्दंड महावितरणच्या ग्राहकांना पडत होता. मात्र, आता अदानींच्या वाढीव वीजदराचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार नाही, असे निर्देश आयोगाने देऊन ग्राहकांना दिलासा दिला आहे. याविरोधात महावितरणने आयोगाकडे दाद मागितली होती, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.