Join us

Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

By दीपक भातुसे | Published: April 18, 2024 6:29 AM

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून घमासान सुरू असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे.

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून घमासान सुरू असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी अडून बसल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अडचण झाली आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत इथून अपक्ष म्हणून अर्जही दाखल केला आहे. महाविकास आघाडीत एका जागेवरून निर्माण झालेला हा तणाव दूर करायचा असेल तर सांगलीची जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसच्या वाट्याला आलेली मुंबई उत्तरची जागा उद्धवसेनेने घ्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरेंना दिल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांवर जबाबदारी

  • मतदारसंघांची अदलाबदल करण्याबाबत काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
  • सांगलीतील लढत उद्धवसेनेसाठी सोपी नाही, तर मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघांची आपसात अदलाबदल करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १९ एप्रिल ही सांगलीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद यावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा आहे. 

मुंबई उत्तरसाठी प्लॅन बी - काँग्रेसचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी नाकारला तर काँग्रेसने मुंबई उत्तरसाठी प्लॅन बी तयार ठेवला आहे.- तिथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याने विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती करून त्यांना उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोण माघार घेणार याकडे लक्ष...

  • सांगलीच्या जागेचा निर्णय होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटील वाद सुरू आहे.
  • काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तेव्हा विनंती करूनही ठाकरेंनी सांगलीवरचा दावा सोडला नाही. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगली मतदारसंघ उद्धवसेनेकडे गेल्याचेही जाहीर करण्यात आले.
  • मात्र, काँग्रेसचे स्थानिक आमदार विश्वजित कदम यांच्यासह आमदार विक्रम सावंत आणि इतर पदाधिकारी सांगलीच्या जागेसाठी आजही प्रचंड आग्रही आहेत. त्यातच काँग्रेसचेच विशाल पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत सांगलीतून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या बंडखोर उमेदवाराची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.  
टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४काँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४सांगलीमुंबई उत्तर