लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सध्याच्या काळात अगदी रेशनकार्ड ते सिमकार्ड आणि सर्वच आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्ड लागते. वास्तव्याच्या दाखल्यासाठीही आधारकार्ड महत्त्वाचे असते. त्यामुळे अगदी बाळ जन्माला आल्यापासून त्याचेही आधारकार्ड काढण्यासाठी पालकांची लगबग असते. अनेकांना परदेशात जायचे असते. त्यांच्या नवजात बाळाला घेऊन जाताना त्यांना त्याचेही आधारकार्ड दाखवावे लागते. अशा वेळी बायोमेट्रिकचे काय? असा सवाल अनेक पालकांच्या मनात येतो. परंतु, बाळाच्या केवळ फोटोवर आधारकार्ड मिळते. बायोमेट्रिक पाचव्या वर्षापासून सुरू होते.
भारतातील रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी क्रमांक दिला जातो. त्याला आधार क्रमांक म्हणतात. आता आधारकार्ड लहानग्यांसाठी अनिवार्य असून ५ वर्षांखालील मुलांनाही आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शाळाप्रवेशाप्रसंगीही आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
पाच वर्षांखालील बालकांसाठी कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाने दिलेले डिस्चार्ज कार्ड- आई किंवा वडील यांपैकी एकाचे आधारकार्ड
पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी
- मुलांच्या आधारकार्डसाठी जवळच्या जवळचे पोस्ट ऑफिस किंवा आधार सेवा केंद्रात जाता येईल.- आधार सेवा केंद्रावर जाऊन एनरोलमेंट अर्ज भरावा- शाळेच्या लेटरहेडवरील पत्ता पुरावा, जन्मतारखेचा दाखला- आधार अर्ज जमा केल्यानंतर बायोमेट्रिक केले जाते.- बायोमेट्रिकमध्ये दहा बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो घेतले जातात.
असे आहेत आधारकार्डचे टप्पे
पहिल्या टप्प्यात पाचव्या वर्षांनंतर बायोमेट्रिक घेऊन आधार नोंदणी केली जाते. त्यानंतर १० आणि त्यानंतर १५ अशा तीन टप्प्यात ही नोंदणी असते. त्यानंतर घराचा पत्ता बदलला असेल किंवा नावात बदल असेल तर त्यानुसार प्रक्रियेअंतर्गत बदल करून घ्यावा लागतो.
वयानुसार बायोमेट्रिक बदल
दोन वर्षांपूर्वीपर्यंत नवजात बाळांचे आधारकार्ड तयार करण्यात येत नव्हते. कारण, पाच वर्षांपर्यंत वेगाने बायोमेट्रिक बदल होत असतात. परंतु, आता बाळांचेही आधारकार्ड काढण्यात येत आहे. नवजात बाळाचे केवळ फोटो काढून आधारकार्ड दिले जाते. पाच वर्षांनंतर बायेमेट्रिक करून आधारकार्ड काढले जाते. दरम्यान, बाळाचा फोटो काढून जरी आधारकार्ड दिले तरीही त्यांच्या चेहऱ्यातही दोन वर्षांत प्रचंड बदल होतो. त्यामुळे बाळाचा जन्मदाखला ग्राह्य धरून त्याच्यासाठीच्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणीही काही पालकांची आहे.
बाल आधारकार्ड
मुलांच्या आधारकार्डला बाल आधारकार्ड संबोधतात. मुलांचे बँकेत खाते उघडण्यासाठीही या बाल आधारकार्डचा उपयोग होतो. आधारकार्ड बनविणारी संस्था युआयडीएआयने देशभरात सुरू केलेल्या नवीन उपक्रमांतर्गत नवजात बाळाच्या जन्मासोबतच रुग्णालयांमध्ये आधारनोंदणी करण्याची तयारीही करण्यात आली आहे. परंतु, सध्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे आधार नोंदणी होत नसून नवजात बाळाचे आधारकार्ड काढण्यासाठी डॉक्टरांकडून किंवा रुग्णालय अधीक्षकांकडूनही कुठल्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही. पालकांना जर त्यांच्या बाळाचे आधारकार्ड काढायचे असेल तर ती त्यांची निवड असते असे कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
ज्यांना परदेशात जायचे असते ते बाळांचे आधारकार्ड काढून घेतात. फोटो काढून त्याआधारे आधारकार्ड दिले जाते. मात्र पहिल्या पाच वर्षांत बाळाच्या चेहऱ्यात वेगाने बदल होतो. १५ ते २० त्यानंतर ३० ते ४० असे चेहऱ्यात बदल होण्याचे टप्पे आहेत. आम्ही पालकांना आधारकार्ड काढण्याचा सल्ला देत नाही. ती त्यांची निवड असते. - डॉ. तुषार पालवे (अधीक्षक, कामा रुग्णालय)