लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनातर्फे लवकरच लोणावळा येथे ‘चाणक्य सेंटर फाॅर एक्सलन्स’ साकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) लोणावळा, कार्ला येथील नऊ एकर जागेवर हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी कन्व्हेन्शन हाॅल, प्रदर्शन दालन, साहसी क्रीडा व वाॅटरपार्क, टेन्ट सिटी, चाणक्य यांचे तब्बल ४२ फुटांचे शिल्प, संग्रहालयह यासह वेलनेस सेंटरही असेल.
या सेंटरमध्ये आर्य चाणक्य यांची राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती आणि विविध विचारांना प्रदर्शित करण्यात येणार आहे. सेंटरच्या उभारणीसाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास नुकतीच राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या निधीच्या तरतुदीत खासगी संस्थांचाही सहभाग असेल. त्यात सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी खासगी व्यावसायिकांच्या सहभागातून उभारण्यात येणार आहे.
नुकतेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या सेंटरसाठी पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर उर्वरित ३७ कोटी रुपयांचा निधी कामगाराची प्रगती विचारात घेऊन टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
या खर्चाचा भार खासगी व्यावसायिकांकडेसेंटरच्या प्रांगणातील प्रवेशद्वार, लाॅबी, सोव्हीनिअर शाॅप, तिकीट खिडकी याकरिता १८.३९ कोटी, वेलनेस/स्पा/ फिटनेस सेंटरसाठी ३.८९ कोटी, ॲडव्हेंचर पार्कसाठी साडेचार कोटी, टेंट सिटीकरिता १० कोटी या सर्व निधीची तरतूद खासगी व्यावसायिकांकडून करण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमही सुरू करण्याचा विचार चाणक्य यांचे कायद्याचे तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय या केंद्रामध्ये शिकवले जाणार आहेत. पर्यटक, शिक्षक आणि चाणक्य यांच्याबद्दल आणखी शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांपर्यंतचे छोटे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.