तुमचे हात सरकारच्या कानाखाली पडले तर...; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:17 PM2024-01-03T17:17:24+5:302024-01-03T17:24:56+5:30
उद्धव ठाकरे यांनी आज अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना पुन्हा एकदा सरकारवर खोक्यांचा आरोप केला आहे.
Uddhav Thackeray Speech ( Marathi News ) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका संपावर आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज अंगणवाडी सेविकांनी मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
"आज मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत नेता म्हणून नाही, तर भाऊ म्हणून आलो आहे. असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा मशाल पेटते. ही मशाल कुणालाही खाक करू शकते.समाजाची सेवा करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर विचार करा, आवाज केवढा येईल," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला बळ देत सरकारवर निशाणा साधला.
"सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण..."
उद्धव ठाकरे यांनी आज अंगणवाडी सेविकांसमोर बोलताना पुन्हा एकदा सरकारवर खोक्यांचा आरोप केला आहे. "आमचं सरकार पडलं नसतं, तर तुम्हाला इथे आंदोलनासाठी यावं लागलं नसतं. भारताला खऱ्या अर्थाने सुदृढ अंगणवाडी सेविका करतात. यांच्याकडे सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण आशाताई-अंगणवाडी सेविकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे का? मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा नकोत, मला निश्चय पाहिजे की, माझं सरकार मी निवडणार. कोरोनामध्ये माझं नाव जरूर झालं. पण त्याचं खरं श्रेय अंगणवाडी सेविकांना आहे. कारण त्या काळात तुम्ही घरोघरी जाऊन लोकांची काळजी घेत होतात, तुम्ही कुपोषित बालकांना आहार देता, पण तुम्हाला सरकारने कुपोषित केलंय. तुम्हाला काहीच मिळत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर ते तुमच्या मागण्या मान्य करतील, नाहीतर आमचं सरकार तुम्ही आणणारच आहात; आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिलं आहे.