आयफ्लोज देणार मुंबईकरांना पुराचा अलर्ट..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:42 PM2023-06-09T12:42:57+5:302023-06-09T12:43:16+5:30

मुंबईत अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा पूरस्थिती निर्माण होऊन मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.

iflo will give flood alert to mumbaikars | आयफ्लोज देणार मुंबईकरांना पुराचा अलर्ट..!

आयफ्लोज देणार मुंबईकरांना पुराचा अलर्ट..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई :मुंबईत अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा पूरस्थिती निर्माण होऊन मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांसाठी आयफ्लोजप्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 

याप्रणालीमुळे पावसाळ्यात हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरीक्षण करुन संभाव्य पूर परिस्थितीची आगाऊ सूचना मिळणार आहे. 
यामुळे मुंबईतील पूर परिस्थितीसाठी पालिका प्रशासनाच्या  आपत्ती व्यवस्थापनासह इतर विभागांना सतर्क राहून पुरामुळे होणारी हानी टाळता येणार आहे. 

आयफ्लोज ही प्रणाली ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूर-प्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे. तसेच या प्रणालीमार्फत संभाव्य पूरप्रवण क्षेत्र, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व २४ विभागीय क्षेत्रांमधील स्थाननिहाय समस्या आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची माहिती प्राप्त होणार आहे.

विविध माहितींचा समावेश

- शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांची क्षमता लक्षात घेऊन पूरस्थितीचा अंदाज वर्तविण्याची तरतूद याप्रणालीमध्ये आहे. यामध्ये एकूण सात मोड्युलचा समाविष्ट आहे.

- शिवाय महत्त्वाचे म्हणजे याप्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पालिका आणि आयएमडीद्वारे स्थापित पर्जन्यमापक स्थानकांच्या नेटवर्कमधील माहितीचा समावेश करण्यात आला आहे.


 

Web Title: iflo will give flood alert to mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.