Join us

रमजानमधील इफ्तार पार्ट्याना यंदा  लगाम  !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 7:09 PM

चमकेशगिरी करणाऱ्याना बसला चाप : निधी गरिबांना वितरित करण्याची मागणी 

 

जमीर काझी 

मुंबई : रमजान महिना आणि त्यात  होणाऱ्या चमचमीत  इफ्तार पार्ट्या हे अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या समीकरणाला यंदा मात्र लगाम बसली आहे.  कोरोनाच्या पादुर्भावासाठी लॉकडाऊन केल्याने दरवर्षी एखाद्या उत्सवासारखे  साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पार्ट्याना यंदा  अटकाव बसला आहे.   इफ्तार पार्टीचा मूळ हेतू हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे, सर्वधर्म समभावाची भावना सुदृढ करणे आणि गरिबांना पोटभर जेवण देणे हा आहे. मात्र काही पार्ट्याचा अपवाद वगळता बहुतांश इफ्तार पार्ट्याना गेल्या काही वर्षांपासून   भपकेबाजपणा  आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याची ओरड होत आहे. त्यामुळे या पार्ट्याना यंदा लगाम बसला असल्याने जाणकार व सुशिक्षित वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यामध्ये खर्च होणारी रक्कम गोरगरीब नागरिक आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्यात यावी, अशी मागणी  त्याच्यातून होत आहे. 

रमजान महिन्यात बहुताश सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था,राज्य सरकारचे विविध विभाग आणि पोलिसांकडून महानगरापासून ते छोट्या गावांपर्यंत इफ्तार पार्टी आयोजित केली जाते.त्यामध्ये विविध मंत्री, राजकारणी, फिल्मस्टार, मान्यवर  व्यक्ती, वरिष्ठ  अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले जाते. साधारण रमजानच्या दुसऱ्या आठवड्यापासून महिन्याअखेरपर्यंत त्या सुरु असतात.मुंबईमध्ये हज हाऊस, इस्लाम जिमखाना तसेच पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध मोठी हॉटेल्स आणि कार्यालये त्यासाठी  महिन्याभरापूर्वीच निश्चित केलेल्या असतात.  इफ्तारमध्ये प्रामुख्याने सिलेब्रेटी, राजकारणी एकमेकाला  आलिगन देऊन  खजूर भरवितात. त्याचे भरपूर फोटोसेशन केले जाते, त्यानंतर पंच पक्वान्न आणि  बिर्याणीवर ताव मारला जातो. या पार्ट्याना बहुताशपणे कार्यकर्ते आणि उचभ्रू नागरिकाचा भरणा  असतो. गोरगरीबाना प्रवेशद्वाराच्या आत येऊही देत नाही. सिलेब्रेटी, राजकारणी निघून गेल्यावर कार्यकर्तेही जेवण अर्धवट टाकून निघून जातात, अन्नाची मोठया प्रमाणात नासाडी होते, त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये  लाखो रुपये होत असल्याची टीका होत असते. 

 

गोरगरिबांना मदत करा गेल्या काही वर्षांपासून इफ्तार पार्टीच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याची परिस्थिती आहे. यंदा  कोविड-19 मुळे यंदा इफ्तार पार्टी होणार नाहीत, त्यामुळे त्यासाठी खर्च होणारी रक्कम गोरगरीब आणि गरजुंना द्यावी, मुखमंत्री सहाय्य्यता निधीला दिल्यास ती उचित ठरणार आहे. - शेख हुमायून ( प्रदेश सल्लागार, जमाते इस्लामी हिंद )

 

 

निष्फळ खर्च धर्मविरोधी इस्लामधर्मात विनाकारण, गैर खर्चाला मनाई आहे. इफ्तार पार्टी च्या निमित्याने जो बाष्कळ खर्च होतोय तो थांबवून गरजुना दान केला पाहिजे. - हाफिज सेंदुल शेख-टेम्पोवाले  (बेलापूर, नवी मुंबई )

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई