Join us

‘कर्तव्यदक्ष’ पोलिसांकडे दुर्लक्ष

By admin | Published: September 01, 2016 4:00 AM

आॅन ड्युटी चोवीस तास असणारे पोलीस जीवाची पर्वा न करता जनतेसाठी सदैव दक्ष राहतात. दुसरे सुरक्षित राहावेत म्हणून ते बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढे जातात.

मनीषा म्हात्रे , मुंबईआॅन ड्युटी चोवीस तास असणारे पोलीस जीवाची पर्वा न करता जनतेसाठी सदैव दक्ष राहतात. दुसरे सुरक्षित राहावेत म्हणून ते बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाईसाठी पुढे जातात. पण, असे करताना त्यांना सुरक्षा मिळत नसल्याने प्राण गमवावे लागतात. सचोटीने काम करणाऱ्या या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या नशिबी मात्र दैनाच येते. कारण, पोलिसांच्या मृत्यूनंतर सरकार दरबारी पायऱ्या झिजवूनही निराशा पडत असल्याचे चित्र दिसून येते. शिंदे यांच्या मृत्यूनंतर हे विदारक वास्तव समोर आले आहे.नवी मुंबईत राहणारे गावंड कुटुंबीय. पोलीस नाईक अजय गावंड डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये डोंगरीच्या वाडीबंदर येथील एका इमारतीत संतोष साळवी नावाचा चोर शिरला होता. तो इमारतीच्या गच्चीवर लपला होता. त्याला पकडण्यासाठी गावंड (४२) हे जीव धोक्यात घालून मागील बाजूने दुसऱ्या मजल्याच्या खिडकीवरून गच्चीत गेले. परंतु दबा धरून बसलेल्या साळवी याने गावंड यांच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने प्रहार केला. त्यात ते जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही राजकीय मंडळी, प्रशासनांच्या भेटींच्या रांगा लागल्या. मात्र टींव्हीवर चमकण्याचे काम झाल्यानंतर सर्वांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली. गावंड यांच्या निवत्तीनंतर त्यांच्या कुटुंबियाना वेतन, २५ लाखाची आर्थिक मदतीसह नोकरीचे आश्वासन दिले. मात्र यापैकी फक्त नोकरी मिळाली. याच नोकरीच्या पगारातून ते स्वत:सह मुलांच्या शिक्षणांचा खर्च भागवत आहे. शासनाकडून मदत मिळेल या आशेने त्या रोज मंत्रालय, पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र ’अहो अजून फाईलच पुढे गेली नाही. कागदपत्रांची तपासणी बाकी आहे, वरिष्ठांची सही नाही असे नानाविध कारणे पुढे करत त्यांना बाहेरची वाट धरावी लागत असल्याचे स्वाती यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे पुढे काय? असा प्रश्न आ वासून त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. त्याचीही जाण हे प्रशासन ठेवत नाही ही फार दुखा:ची बाब असल्याचे सांगताना त्या अश्रू रोखू शकल्या नाही. अंधेरी परिसरात राहणारे सरनोबत यांचे कुटुंब. खेरवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तू आप्पा सरनोबत. सप्टेंबर २०१२ मध्ये पोलिसावर हल्ला करून गाडी पळवून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करताना ते जखमी झाले. आणि याच हल्ल्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निधनाला चार वर्षे उलटून गेली. आर्थिक मदत तर दुरच साधे पदक देखील त्यांना मिळाले नाही. पत्नी आणि दोन मुलांसोबत ते येथे राहायचे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. मुलाला नोकरीवर घेऊन प्रशासनाने हात वर केले. मात्र पुढे काय. प्रशासनानेच मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सरनोबत यांच्या पत्नी कविता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.