महावितरण अधिकाऱ्यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष
By Admin | Published: June 13, 2015 10:51 PM2015-06-13T22:51:41+5:302015-06-13T22:51:41+5:30
परिसरातील गावपाड्यामध्ये गंजलेले वीज खांब, जीर्ण झालेल्या तारा, धोकादायक ट्रान्सफॉर्मर आदीमुळे अपघाताची शक्यता आहे.
बोर्डी : परिसरातील गावपाड्यामध्ये गंजलेले वीज खांब, जीर्ण झालेल्या तारा, धोकादायक ट्रान्सफॉर्मर आदीमुळे अपघाताची शक्यता आहे. याबाबत वीज कार्यालयाकडे नागरीक व ग्रामपंचायतींनी अनेकवेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महावितरणच्या डहाणू कार्यालयाअंतर्गत बोर्डी, कोसबाड, नरपड या उपकेंद्रातील गावपाड्यांमध्ये वीज यंत्रणा धोकादायत ठरत आहे. किनाऱ्यालगत गावांमध्ये रेताड जमिन व क्षारयूक्त हवा असल्याने लोखंडी खांब गंजले असून सिमेंट खांबाचे प्लास्टर खिळखिळे झाले आहे. अनेकवेळा वादळी वारा आल्यास वीज खंडित होते. विशेष म्हणजे, खांब कुजल्याने वीज कर्मचाऱ्यांना देखभाल दुरूस्तीकरिता त्यावर चढणे कठीण झाले आहे.
चिखले गावातील मुख्य रस्त्यालगत दलित वस्ती, घोलवड येथील मरवाडा, मांगेलआळी, रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील खेडपाडा व प्लाटपाडा येथील क्रीडांगण, शाळा, बाजारपेठेमध्ये धोकादायक क्षेत्र आहेत. विविध ग्रामपंचायती प्रमाणेच किरण पाटील, महेश सुरती, जयेश पाटील, जयंत माच्छी, नितीन मोठे आदींनी यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधला, मात्र उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.