Join us

मराठी भाषा दिनाकडे दुर्लक्ष

By admin | Published: May 02, 2015 5:09 AM

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते. परंतु विद्यापीठाकडून काढण्यात येणाऱ्या परिपत्रकांना महाविद्यालये दाद देत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. विद्यापीठाशी संलग्न ७४० पैकी केवळ १७१ महाविद्यालयांनीच मराठी भाषा दिवस साजरा केल्याचे उघड झाले आहे.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा असलेल्या मराठीचे जतन व संवर्धन व्हावे, या हेतूने महाविद्यालयांमध्ये दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे महाविद्यालयांना देण्यात येतात. तसेच मराठी भाषा दिन साजरा केल्याचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्याची सूचना महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे देण्यात येते. जी महाविद्यालये भाषा दिन साजरा करणार नाहीत, अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या होत्या. तरीही विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी तो साजरा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी महाविद्यालयांनी मराठी भाषा दिन साजरा केला पाहिजे. मराठी भाषा दिन साजरा करा, असे परिपत्रक विद्यापीठाला काढण्याची गरज भासू नये, असे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)