जमीर काझी ल्ल मुंबईजनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र राबत असलेल्या खाकी वर्दीवाल्यांच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन राज्य सरकार व वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून वारंवार दिले जात असले तरी पोलीस महासंचालक कार्यालयातील ‘बाबूं’नी केलेल्या घोळाचा फटका एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला निवृत्तीनंतरही बसत आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारात दाद मागितल्यानंतर अपील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे आदेश देऊनही त्याकडे डोळेझाक करत ‘बाबूगिरी’ने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. कोल्हापुरातील निवृत्त साहाय्यक निरीक्षक बाबासाहेब शेख पदोन्नतीला पात्र असूनही कार्यरत असताना त्यांना डावलण्यात आले. किमान पेन्शनमध्ये तरी थोडी वाढ मिळावी यासाठी निरीक्षक म्हणून बढतीचा मानीव दिनांक मिळावा, यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. निवृत्त होऊन पाच वर्षे लोटली तरी त्यांच्यावरील अन्याय सुरूच आहे. अपील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकरणावर १५ दिवसांत कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र तरीदेखील प्रशासनाने गेले आठ महिने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाळ हे प्रामाणिक अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी निर्भीडपणे निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्याच कार्यालयातील ‘बाबू’ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव शेख घेत आहेत.बाबासाहेब शेख हे १९७४ साली पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. खात्यांतर्गत परीक्षा दिल्यानंतर १९९५ मध्ये त्यांना उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली. महासंचालक कार्यालयाने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत खुल्या प्रवर्गात साहाय्यक निरीक्षक पदाच्या बढतीसाठी त्यांचे नाव १९ व्या क्रमांकावर होते. मात्र त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली नाही. आस्थापना विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्यांच्या नावापुढे ‘या अधिकाऱ्याचा ठावठिकाणा लागत नाही’, असे नमूद करून बढतीच्या यादीतून नाव वगळले. प्रत्यक्षात त्यावेळी शेख हे सांगली जिल्ह्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अखेरीस याच ठिकाणाहून ३० नोव्हेंबर २०१० मध्ये ते निवृत्त झाले. याबाबत त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून योग्य माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ५ सप्टेंबर २०१३ मध्ये माहिती अधिकारान्वये आपला ठावठिकाणा लागत नाही, हे कोणत्या आधारावर ठरविण्यात आले, याबाबत संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता आस्थापना विभागातील माहिती अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा नियम सांगत माहिती देण्याचे टाळले. त्यावर त्यांनी प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. याबाबत आस्थापना विभागाचे तत्कालीन विशेष महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे ५ आॅगस्ट १४ रोजी सुनावणी झाली असता त्यांनी शेख यांची मागणी रास्त असून त्यांच्या बढतीबाबत मानीव दिनांक प्रकरणात १५ दिवसांत कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाला केली. मात्र या सुनावणीला ८ महिने उलटूनही अद्याप योग्य तो बदल करणे दूरच त्याबाबत साधी माहिती देण्यात आली नसल्याचे शेख यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी शेख यांनी अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुन्हा भेट घेऊन अद्याप कार्यवाही न झाल्याचे निदर्शनास आणले होते. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याला विलंबाबाबत लेखी खुलासा करण्याचे आदेश देणाऱ्या कुलकर्णी यांची थोड्याच दिवसांत बदली झाली आणि पुढे कार्यवाही झाली नाही.च्आपले खाते व वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल आदर असल्याने आपण आतापर्यंत न्यायाची प्रतीक्षा करीत होतो. मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने आता माहिती आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे बाबासाहेब शेख यांनी सांगितले.अन्याय होऊ देणार नाही आस्थापना विभागातील या प्रकरणाबाबत आपल्याला माहिती नाही. त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.- संजीव दयाळ, पोलीस महासंचालक
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची उपेक्षा !
By admin | Published: April 28, 2015 1:11 AM