नवी मुंबई : शहरात डांबरीकरणाचे काम करणारे ठेकेदार कामगारांना अत्यावश्यक सुविधाही देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गमबुट, हातमोजे नसल्यामुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात अनेक विकासकामे सुरू केली आहेत. मोठ्याप्रमाणात रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे करण्यात येत आहेत. परंतु सदर काम करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. डांबराचे बॉक्स घेवून कामगार फिरत असतात. त्यांच्या हातामध्ये मोजे व पायात मोजेही नसतात. अनेक ठिकाणी अत्याधुनिक यंत्राद्वारे खडी व डांबर मिसळले जाते. परंतु रोडवर फावडे घेवून कामगारांना ते एकसमान करावे लागते. पायात स्लीपर घातलेले कामगार हे काम करत असतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमाप्रमाणे ठेकेदाराने कामगारांना आवश्यक सुविधा दिल्या पाहिजेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. आवश्यक साहित्य देवून त्याचा वापर होतो की नाही हे पाहिले पाहिजे. ठेकेदार जर दुर्लक्ष करत असेल तर पालिकेच्या अधिकार्यांनी संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. परंतु प्रशासन काहीच कारवाई करत नाही. सीवूडमधील शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान यांनीही काही दिवसांपूर्वी याविषयी तक्रार केली होती. त्या विभागापुरती दखल घेतली, परंतु शहरात मात्र अद्याप या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. (प्रतिनिधी)
कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 23, 2014 3:07 AM