Join us

लसीकरणात औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM

संघटनांमध्ये नाराजीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला आता चार महिने उलटून गेले आहेत. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये औषध ...

संघटनांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला आता चार महिने उलटून गेले आहेत. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये औषध विक्रेते दुसऱ्या क्रमांकावर असूनही अद्याप लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरणात औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी नाराजी औषध विक्रेत्या संघटनांनी व्यक्त केली.

कोविड आजारामुळे औषध विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय असे मिळून २०० हून अधिक जण दगावले आहेत. तर, देशात हीच संख्या ४२२ असल्याचे सांगण्यात येते. अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, फ्रंटलाईन वर्कर्समध्ये औषध विक्रेते दुसऱ्या क्रमांकावर असूनही अद्याप लसीकरणापासून वंचित आहेत. कोणतीही व्यक्ती औषधांसाठी औषध दुकानात येते त्यावेळी ती काेराेना पॉझिटिव्ह आहे की नाही, याची कल्पना औषध विक्रेत्याला नसते. तरीही तो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो. औषध विक्रेता सर्वांत आधी बाधित होण्याची शक्यता असते. तरीही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लसीचे संरक्षण नाही, हे दुर्दैवी असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली. औषध विक्रेत्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी करूनही सरकारने साधी दखलही घेतली नाही. सरकारने गांभीर्याने निर्णय न घेतल्यास व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

...........................................................