श्रवण दोषाकडे दुर्लक्ष करणे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:01+5:302021-03-04T04:10:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, २०५० सालापर्यंत जगात चार व्यक्तींमधील एका व्यक्तीला श्रवणदोष असणार आहे. ...

Ignoring hearing loss is serious | श्रवण दोषाकडे दुर्लक्ष करणे गंभीर

श्रवण दोषाकडे दुर्लक्ष करणे गंभीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, २०५० सालापर्यंत जगात चार व्यक्तींमधील एका व्यक्तीला श्रवणदोष असणार आहे. श्रवणदोषाचे निदान न करणे, उशिरा निदान करणे यामुळे संभाषणात अडथळा निर्माण होण्याचे प्रमाणही वाढत असून, या समस्यांच्या माध्यमातून भविष्यात मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. श्रवणदोषांच्या या समस्येबद्दल केईएम रुग्णालयाचे कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. हेतल मारफातिया यांच्याशी साधलेला संवाद.....

श्रवणदोष म्हणजे काय

व्यक्तीचा श्रवण कौशल्यविकास त्याच्या वैयक्तिक श्रवण क्षमतेवर अवलंबून असतो. श्रवणासंबंधित दोष किंवा समस्या म्हणजे श्रवणदोष होय. श्रवणदोषाची विविध कारणे असतात. या श्रवणदोषाचे प्रामुख्याने ‘सवहन दोष- ध्वनीच्या वहनासंबंधी दोष, संवेदनी दोष- ध्वनीच्या संवेदनासंबंधी दोष, मिश्र श्रवणदोष- यामध्ये संवहन आणि संवेदनी अशा दोन प्रकारचा दोष. असे तीन प्रकार आहेत. व्यक्तीच्या श्रवण क्षमतेमध्ये वयानुरूप बदल होतो, तसेच मानसिक ताणतणाव यामुळेसुद्धा श्रवणविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कानाची आणि श्रवण क्षमतेसंबंधी काळजी घेणे आवश्यक असते.

लहान मुलांमध्ये श्रवणदोषाचे प्रमाण किती आहे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार १००० पैकी ५ मुलांना गंभीर श्रवणदोष असतो. देशात २७,००० पेक्षा जास्त मुले दरवर्षी श्रवणदोषसहित जन्‍मतात. श्रवणदोष किंवा श्रवणशक्ती बंद होणे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, कारण ते दिसून येत नाही आणि अनेकप्रकरणी निदान विलंबाने होते. युनिव्हर्सल न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंगमुळे (यूएनएचएस) नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे लवकर निदान करता येते आणि ही चाचणी नवजात बालकांमध्ये श्रवणदोष शोधण्यासाठी आणि लवकर हस्तक्षेप करण्यासाठी महत्त्वाची आहे. इतर विकसित देशांमध्ये यूएनएचएस ही चाचणी सक्‍तीची आहे; परंतु ती भारतात केरळ वगळता नवजात बालकांसाठीच्या सक्‍तीच्या आरोग्य तपासणीच्या यादीत समाविष्ट नाही. तपासणी कार्यक्रम उपलब्ध नसल्यामुळे पालक मोठ्या काळासाठी भाषा, शिक्षण आणि अंदाज याद्वारे श्रवणदोष शोधण्यावर अवलंबून असतात. या विलंबामुळे मुलांना साधारण २४ महिन्यांचा सर्वांगीण विकासाचा कालावधी मिळत नाही. त्याउलट, यूएनएचएसची अंमलबजावणी होणाऱ्या देशांमध्ये सहा महिन्यांसारख्या अत्यंत कमी कालावधीत उपाययोजना करता येतात.

कानाची काळजी कशी घ्यावी

कान स्वच्छ ठेवणे, कानातील मळ काढताना कुठल्याही अणकुचीदार वस्तूंचा वापर न करणे, कानाला इजा किंवा दुखापत होणार नाही याची काळजी घेणे, कान दुखत असल्यास कानामध्ये तेल अथवा इतरांच्या सल्ल्याने काहीही टाकू नये, कुठल्याही प्रकारचे घरगुती उपाय करू नका, कान दुखत असल्यास कानातून पू किंवा द्रवस्राव होत असल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञाशी संपर्क साधावा. वेळीच औषधोपचार घ्यावेत, मोठ्या आवाजात संगीत ऐकणे, दूरचित्रवाणी बघणे टाळावे, संगीत ऐकण्यासाठी तासन्‌तास हेडफोन किंवा मोबाइल इअरिंग फोनचा अतिरिक्त वापर टाळावा, सततच्या वापरामुळे श्रवणदोष लवकर होतो. श्रवणविषयक समस्या असल्यास वेळोवेळी श्रवण तपासणी करावी, श्रवणतज्ज्ञांशी संपर्क करा, श्रवणयंत्र वापरत असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.

उपचारांची प्रक्रिया कशी असते

उजव्या कानातून आवाज येत असेल आणि डावा कान चांगला असेल तर आपला मेंदू स्वत:च उजव्या कानाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. कानाच्या या समस्येला औषधांची फारशी गरज नसते. ही औषधे ‘सिडेटिव्हज्’ असतात. कानात निर्माण झालेली समस्या औषधांमुळे दाबून टाकली जाते आणि त्यामुळे मेंदू त्या समस्येवर जे उपाय करू पाहत असतो त्याचा गोंधळ उडतो. त्यामुळे औषधे बंद केल्यावर समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. या औषधांचे काही दुष्परिणामदेखील आहेत.

अर्थात आतील कानाला झालेला संसर्ग न्यूरो सिफिलिसमुळे असेल तर त्यावर प्रतिजैविके द्यावी लागतात; परंतु आतील कानाच्या विषाणू संसर्गाला औषध द्यावे लागत नाही, कारण विषाणू संसर्ग होऊन गेल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आतील कानाची समस्या निर्माण झालेली असते, तर मिनिअर्स डिसिजमध्ये कान शांत करायला स्टिरॉइड इंजेक्शन द्यावे लागते. कानातील समस्या दूर करण्याकामी मेंदूला प्रशिक्षित करता येते. याला ‘व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन’ असे म्हणतात. म्हणजेच कानातील तोल सांभाळणाऱ्या यंत्रणेचे एक प्रकारे पुनर्वसन. विशिष्ट प्रकारच्या व्यायामांच्या आधारे मेंदूचे हे प्रशिक्षण करता येते. अर्थात हे व्यायाम प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे असतात आणि ते सुरू केल्यावर त्याचा चुटकीसरशी परिणाम दिसला असे होत नाही. त्याला काही वेळ द्यावा लागतो व त्यामुळे आजार बरा होऊ शकतो. या व्यायामांच्या चार ते पाच पायऱ्या आहेत. साधारणत: दररोज एक ते दीड मिनिटे असा पाच वेळा असा सुचविलेला व्यायाम केला की कानाची तक्रार दूर करण्यासाठी मेंदूचे प्रशिक्षण सुरू होते. दहा ते बारा आठवड्यांत त्याने फरक पडू शकतो.

Web Title: Ignoring hearing loss is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.