रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

By जयंत होवाळ | Published: June 24, 2024 06:55 PM2024-06-24T18:55:06+5:302024-06-24T18:55:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष ...

IIT advises appointing special team to repair potholes on roads | रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंवई आयआयटीने  दिला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, उबाबत उपाययोजनाही सुचवल्या आहेत.

पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांचा उच्च दर्जा , कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने पालिका अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी आयआयटीत   एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात  आली  होती. पालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयु्क्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्‍या संकल्‍पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव, प्रा. पी. वेदगिरी, प्रा. दीपांकर चौधरी, उप आयुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक)  मनिषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्ते कामातील   नियुक्त अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५५ हून अधिक अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

पालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेला रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्‍तापूर्ण होण्‍यासाठी पालिका अभियंत्‍यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी देखील अभियंत्यांनी सजग राहिले पाहिजे. कॉंक्रिट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्‍ता चाचण्या, हवामान यांसह कॉंक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना या विषयी अभियंत्‍यांनी कालानुरूप प्रशिक्षण घेऊन अद्ययावत राहिले पाहिजे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपणे नियोजन केले पाहिजे, असा सूर तज्‍ज्ञांच्‍या कार्यशाळेत उमटला.

मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करताना निर्माण होणारी आव्हाने, याबाबत मअभियंत्यांनी कार्यशाळेदरम्यान विचार मांडले. सिमेंट कॉंक्रिट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूक कोंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने असल्याचे अभियंत्यांनी नमूद केले. त्यासोबत वाहतूक कोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले.

आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी,  सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या आराखड्याच्‍या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ या अनुषंगाने विचार करून सुयोग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परिक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि मृदा परिक्षणाची आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याच्‍या आयुष्यमानात वाढ होवू शकते, यासह इतर आवश्यक बाबींचाही त्यांनी उहापोह केला. तसेच प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

सिमेंट काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱया तंत्रज्ञानांचीही त्यांनी माहिती दिली. तर, प्रा. डॉ. के. व्ही. राव यांनी पालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याची गरज विषद केली.
 

Web Title: IIT advises appointing special team to repair potholes on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई