शैक्षणिक संस्थांच्या जागतिक क्रमवारीत देशात आयआयटी बॉम्बे पुन्हा अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:12 PM2020-06-10T19:12:51+5:302020-06-10T19:13:14+5:30

मात्र जागतिक क्रमवारीत घसरण , शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे संचालकांचे आश्वासन

IIT Bombay again tops the world in the world rankings of educational institutions | शैक्षणिक संस्थांच्या जागतिक क्रमवारीत देशात आयआयटी बॉम्बे पुन्हा अव्वल

शैक्षणिक संस्थांच्या जागतिक क्रमवारीत देशात आयआयटी बॉम्बे पुन्हा अव्वल

googlenewsNext


मुंबई : बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बे पुन्हा एकदा वरचढ राहिले आहे. जगाच्या दोनशे उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बेला १७२ वे स्थान मिळाले आहे. मागील वर्षीपेक्षा क्रमवारीत यंदा आयआयटी बॉम्बेची घसरण झाली असून ही घसरण २० स्थानांची आहे.  मागील वर्षी आयआयटी बॉम्बेला १५२ वे स्थान मिळाले होते. पहिल्या ५०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातील केवळ आठ संस्थांना स्थान मिळविता आले आहे.

देशात प्रथम स्थान मिळविलेल्या आयआयटी बॉम्बेला जागतिक क्रमवारीसाठी १०० पैकी ४६ गुण मिळविता आले आहेत. देशात जरी आम्ही प्रथमी स्थान मिळविण्यात यशस्वी झालो असलो तरी जागतिक पातळीवर घसरलेल्या कर्मवरीवर आम्ही जास्त लक्ष देणार असल्याचे आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले. क्यूएसकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात  संस्थेचा शैक्षणिक दर्जा तपासला जातो आणि गुण दिले जातात. त्यात आयआयटी बॉम्बेला कमी गुण मिळाल्याने यापुढे प्रशासन तो वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

क्यूएस दरवर्षी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करते. यावर्षी १,०२९ विद्यापीठांची यादी तयार केली गेली. यात अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) सलग ९ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. ही सर्व अमेरिकन विद्यापीठे आहेत. पाचवे स्थान यूकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला देण्यात आले आहे.  

याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर १८५ व्या स्थानी तर आयआयटी दिल्ली १९३ व्या स्थानी आहे. जगभरातील पहिल्या हजार उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठात भारतातील २१ शिक्षण संस्थाचा समावेश यंदाच्या वर्षीच्या क्यूएस रँकिंगमध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरला भारतातील सर्वात उत्तम रिसर्च विद्यापीठाचा दर्जा या रँकिंगमध्ये मिळाला आहे. २७५ व्या स्थानी आयआयटी मद्रास, ३१४ व्या स्थानी आयआयटी खरगपूर, ३५० व्या स्थानी आयआयटी कानपूर,३८३ व्या स्थानी आयआयटी रुरकी आणि ४७० व्या स्थानी आयआयटी गुवाहाटीने स्थान मिळवले आहे. दिल्ली विद्यापीठाला ५०१  ते ५१० च्या मध्ये स्थान मिळाले आहे . तर हैद्राबाद विद्यापीठ आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला ६५१ ते ७०० च्या रँक मध्ये स्थान मिळाले आहे.

 

 

Web Title: IIT Bombay again tops the world in the world rankings of educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.