IIT Bombay: आयआयटी मुंबईचे दानशूर विद्यार्थी, घरांसाठी दिले १४ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:13 IST2025-02-05T12:11:53+5:302025-02-05T12:13:05+5:30

ITT Bombay students: आयआयटी, मुंबईतून १९७४ मध्ये पदवी घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी समाज आणि संस्थेबद्दलच्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून पुढे आले आहेत.

IIT Bombay: Charitable students of IIT Mumbai, gave 14 crores for houses! | IIT Bombay: आयआयटी मुंबईचे दानशूर विद्यार्थी, घरांसाठी दिले १४ कोटी!

IIT Bombay: आयआयटी मुंबईचे दानशूर विद्यार्थी, घरांसाठी दिले १४ कोटी!

मुंबई: आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या सुवर्णमहोत्सवी बॅचने 'हर्ट्स ७४' हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून ते २०३४ पर्यंत ग्रामीण भागात पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि परवडणाऱ्या एक लाख घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट आयआयटीने समोर ठेवले आहे. त्यासाठी हे माजी विद्यार्थी संस्थेला १४ कोटी रुपयांचा निधीही देणार आहेत.

आयआयटी, मुंबईतून १९७४ मध्ये पदवी घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी समाज आणि संस्थेबद्दलच्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून पुढे आले आहेत. ग्रामीण भागात पर्यावरणस्नेही, परवडणारी आणि टिकाऊ घरे बांधण्याच्या दृष्टीने संशोधनासाठी हे माजी विद्यार्थी संस्थेला मदत करणार आहेत. 

त्यातून नावीन्यपूर्ण, शाश्वत, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलात तग धरू शकतील अशी घरे बांधण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही घरे उभारण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याच्या वापराचे नवे तंत्रज्ञानही विकसित केले जाईल.

या प्रकल्पात बांधकाम साहित्य आणि स्वच्छता, अक्षय ऊर्जा आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकणाऱ्या घरांच्या निर्मितीत संशोधनाचाही महत्त्वाचा भाग असेल. तसेच त्यात स्थानिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. 

आयआयटी, मुंबईचे हे माजी विद्यार्थी १४ कोटी रुपये देणार आहेत. त्यापैकी दहा कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. त्यातील आठ कोटी रुपयांचा वापर 'हर्ट्स ७४' प्रकल्पासाठी केला जाणार आहे, असे आयआयटी प्रशासनाने सांगितले.

'ईटस ७४' प्रकल्पाचे ध्येय

विविध प्रदेशांमधील लाभार्थ्यांच्या पसंतीला उतरतील अशा घरांची उभारणी करणे. आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय शाश्वतता आणि गृहनिर्माण साहित्याच्या टिकाऊपणावर भर. कौशल्ये विकसित करून स्थानिक नागरिकांना नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करणे.

माजी विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे देशातील गरीब कुटुंबांना परवडणारी आणि टिकणारी घरे देण्याच्या उद्देशाने क्रांतिकारक पाऊल पडणार आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. -प्रा. रवींद्र गुडी (डीन, कॉर्पोरेट रिलेशन विभाग, आयआयटी, माजी विद्यार्थी)

Web Title: IIT Bombay: Charitable students of IIT Mumbai, gave 14 crores for houses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.