आयआयटी मुंबईला मिळाली १६० कोटींची देणगी; पण कोणी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:16 PM2023-08-25T12:16:53+5:302023-08-25T12:17:27+5:30

आयआयटी मुंबई पुन्हा एकदा दानमध्ये मिळालेल्या रकमेमुळे चर्चेत आहे.

IIT Bombay Gets Rs 160 Crore Donation From Anonymous Alumnus | आयआयटी मुंबईला मिळाली १६० कोटींची देणगी; पण कोणी दिली?

आयआयटी मुंबईला मिळाली १६० कोटींची देणगी; पण कोणी दिली?

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत शिक्षणासाठी ५० वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्यानिमित्ताने ही रक्कम दान केली होती. नंदन नीलेकणी स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. दरम्यान, आयआयटी मुंबई पुन्हा एकदा दानमध्ये मिळालेल्या रकमेमुळे चर्चेत आहे. यावेळी संस्थेला जवळपास १६० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी ही देणगी एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहे. 

आयआयटी मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे सुभासिस चौधरी यांनी सांगितले. तसेच, भारतीय शैक्षणिक जगतात ही एक अनोखी घटना आहे. जेव्हा अज्ञात व्यक्तीने १६० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबच्या स्थापनेसाठी असल्याचे सुभासिस चौधरी म्हणाले. याशिवाय, ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबची स्थापना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवामानात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केली आहे, असे सुभासिस चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मुंबईचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावरील कामगिरीच्या बाबतीत, आयआयटी मुंबईला  QS World University रँकिंग 2023-24 मध्ये 149 वा रँक मिळाला आहे. कॅम्पस प्लेसमेंट्स आणि फॅकल्टीसाठी अव्वल असलेली ही संस्था आता देणग्यांसाठी चर्चेत आहे.

नंदन नीलेकणी यांनी संस्थेला दान केलेली एकूण रक्कम किती?
इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी गेल्या जून महिन्यात आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत शिक्षणासाठी ५० वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्यानिमित्ताने ही रक्कम दान केले होते. नीलेकणी यांनी यापूर्वी मुंबई आयआयटीला ८५ कोटी रुपये दान केले होते.  त्यांनी संस्थेला दान केलेली एकूण रक्कम आता ४०० कोटी रुपये एवढी झाली आहे. एखाद्या संस्थेला माजी विद्यार्थ्याने दान केलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. नीलेकणी यांनी १९७३ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला होता. ही संस्था माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ असून माझ्या प्रवासाचा पाया संस्थेने रचला. संस्थेने मला जे काही दिले, त्याबाबत एक छोटेसे योगदान आहे, असे नीलेकणी म्हणाले होते.
 

Web Title: IIT Bombay Gets Rs 160 Crore Donation From Anonymous Alumnus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.