इंजेक्शन घ्या बिनधास्त; सुईविरहित सिरिंजची निर्मिती, आयआयटीत संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:53 IST2024-12-28T06:53:12+5:302024-12-28T06:53:25+5:30

शॉक सिरिंजचे नवे तंत्र आयआयटीतील संशोधक पथकाने विकसित केले आहे. 

IIT Bombay has succeeded in developing needle free syringe | इंजेक्शन घ्या बिनधास्त; सुईविरहित सिरिंजची निर्मिती, आयआयटीत संशोधन

इंजेक्शन घ्या बिनधास्त; सुईविरहित सिरिंजची निर्मिती, आयआयटीत संशोधन

मुंबई : इंजेक्शन म्हटले की भल्याभल्यांची टरकते. इंजेक्शनची सुई हाताला टोचली जात असताना अनेकजण ओरडतात, रडतात. त्याला मोठी माणसेही अपवाद नाहीत. मात्र, आता इंजेक्शनला घाबरण्याची गरज नाही. कारण सुईविरहित सिरिंजची निर्मिती करण्यात आयआयटी, मुंबईला यश आले आहे. शॉक सिरिंजचे नवे तंत्र आयआयटीतील संशोधक पथकाने विकसित केले आहे. 

मुंबईतील आयआयटीच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील प्रा. वीरेन मेनेझेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने या शॉक सिरिंजची निर्मिती केली असून, त्यासंदर्भातील संशोधन ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हायसेस’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. बॉलपेनपेक्षा किंचित लांब असलेली ही सिरिंज २०२१ मध्ये प्रा. मेनेझेस यांच्या प्रयोगशाळेत विकसित झाली आहे. 

शॉक सिरिंजची कार्यक्षमता तपासण्यासाठी आयआयटीच्या संशोधकांनी तीन वेगवेगळ्या चाचण्या केल्या. यात तीन वेगवेगळ्या प्रकारची औषधे उंदरांमध्ये टोचली. भुलीच्या औषधाची परिणामकारकता ही नेहमीच्या इंजेक्शनसारखीच राहिली. तर अँटिफंगलसारख्या दाट औषधांचे वितरण करताना शॉक सिरिंज ही नेहमीच्या सुईपेक्षा अधिक प्रभावी ठरली. शॉक सिरिंजने मधुमेही उंदरांना इन्सुलिन दिल्यावर नेहमीच्या सुईच्या तुलनेत रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रभावीपणे खाली गेली, असेही संशोधनात आढळून आले.

शॉक सिरिंज आहे कशी?

शॉक सिरिंजमध्ये एक सूक्ष्म आघात नलिका असते. यातील प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषध भरलेल्या शॉक सिरिंजवर दबाव आणतो. 

त्यातून या द्रवरूपातील औषधाचा एक अतिसूक्ष्म फवारा तयार होतो. या फवाऱ्याच्या वेग विमानाच्या उड्डाणाच्या वेळच्या वेगाच्या दुप्पट असतो. 

नेहमीच्या सुईच्या सिरिंजमुळे त्वचेला अणकुचीदार टोकाने छिद्र पडते. शॉक सिरिंजमुळे तसे न होता त्याऐवजी आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या शॉक वेव्ह वापरून सिरिंजच्या नॉझलमधून त्वचेला छिद्र पाडले जाते. 

शॉक सिरिंज वापरून औषध वितरित करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळायच्या आत अत्यंत वेगाने आणि सौम्यपणे होते.

शॉक सिरिंजचे फायदे

वेदनारहित इंजेक्शन.

लहान मुले आणि मोठ्यांच्या लसीकरण मोहिमांना वेग मिळेल. 

सुईची हाताळणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने किंवा अयोग्यपणे विल्हेवाट लावल्यामुळे होऊ शकणारे रक्तजन्य आजार टाळता येतील. 

शॉक सिरिंजच्या एकाच सिरिंजने १००० पेक्षा जास्त इंजेक्शन दिली जाऊ शकतात. त्यातून प्रत्येकवेळी इंजेक्शनची नॉझल बदलण्याच्या खर्चात घट होईल.

ही शॉक सिरिंज रुग्णाला वेदनारहित इंजेक्शन दिले जावे या हेतूने तयार करण्यात आली आहे. रुग्णाच्या शरीरात अनोख्या पद्धतीने औषध सोडले जाते. त्यामुळे रुग्णाला वेदनाही होत नाहीत - प्रियांका हंकारे, पीएचडी विद्यार्थिनी आणि अभ्यासातील प्रमुख संशोधिका 

Web Title: IIT Bombay has succeeded in developing needle free syringe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.