Join us

आयआयटी बॉम्बे १० टक्के आरक्षण लागू करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:59 AM

आयआयटीच्या पहिल्या वर्षांत पहिल्या टप्प्यातील प्रवेश क्षमतेत एक तृतीयांशाने वाढ करून त्यानंतर उर्वरित जागा २०२०-२१ या वर्षांत भरण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे.

मुंबई : आयआयटीच्या पहिल्या वर्षांत पहिल्या टप्प्यातील प्रवेश क्षमतेत एक तृतीयांशाने वाढ करून त्यानंतर उर्वरित जागा २०२०-२१ या वर्षांत भरण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे. संस्थेच्या अतिरिक्त आवश्यकतेविषयी केंद्राला कळविले असल्याची माहिती संस्थेकडून मिळाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित १० टक्के जागा एकाच वर्षांत उपलब्ध करून देणे कठीण असल्याने सामान्य प्रवगार्तून त्या दोन टप्प्यांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर वरील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.राज्य सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना येत्या २ वर्षांत १० टक्के आरक्षण लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खुला वर्ग, तसेच एससी, एसटी प्रवर्गातील जागा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव जागा हे सारे मिळून आरक्षणाच्या एकूण जागांची संख्या २५ टक्केपर्यंत होत आहे. यामुळे केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावामध्ये जागांमध्ये एकूण ५५७ जागांची वाढ संस्थेकडून प्रास्तवित करण्यात आली आहे. पवईतील शैक्षणिक संस्थेची सध्याची विद्यार्थी क्षमता ११ हजार आहे. १० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर येत्या ४ ते ५ वर्षांत ही क्षमता २७५० जागांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थी क्षमता वाढल्याने केवळ वसतिगृहांच्या सुविधांमध्ये नाही तर प्राचार्य , शिक्षकेतर कर्मचारी याची तुलनात्मक संख्या याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. संस्थेमध्ये सध्याच्या विद्यार्थी क्षमतेलाही जागा अपुरी पडत असून किमान ७ माळयांच्या २ इमारतींचे काम संकुलात सुरु आहे. येत्या जूनपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून या प्रत्येक इमारतीची विद्यार्थी क्षमता १११५ पर्यंत आहे. १० टक्के आरक्षण लागू होण्याच्या आधीपासून या इमारतींचे काम सुरु असून जागा अपूरी असल्याने हे प्रस्तावित करण्यात आले होते. आता क्षमता वाढल्यावर हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी १० टक्के आरक्षण लागू करणे थोडे कठीण काम असल्याची प्रतिक्रिया एका प्राध्यापकांकडून देण्यात आली.

टॅग्स :मुंबई