मुंबई : राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाचे (एनआयआरएफ) रँकिंग गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले असून मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये चौथ्या (८०. ७५) क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावरच असली तरी यंदा तिच्या गुणांकात भर पडली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने १९ वे स्थान (५८. ७७)पटकाविले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने २५ वे (५५. ४३), मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३० वे(५३. २०) तर मुंबईच्याच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने ३४ वे (५१. ७०) स्थान पटकाविले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या १०० संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.देशातील उच्च शिक्षण संस्थाचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)ने गुरुवारी देशभरातील संस्थांची क्रमवारी ऑनलाईन जाहीर केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून हे रँकिंग जाहीर केले आहे. विविध विभागनिहाय अशा १० क्षेत्रात ही क्रमवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, विधी आदींचा समावेश आहे. यंदा प्रथमच दंत (डेन्टल अभ्यासक्रम) याचाही समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नववा क्रमांक (६१. १३) तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.यंदा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मानाकनात एका क्रमांकाची सुधारणा झाली आहे. मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला मागे टाकत १७ व्या स्थानावरून १४ व्या स्थानावर(५६. ०४) झेप घेतली आहे. तर आयसीटीच्या मानांकनात घसरण होऊन १५ व्या स्थानावरून १८ व्या स्थानावर (५४. १० )समाधान मानावे लागले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात ही मागील वर्षीच्या तुलनेने सुधारणा झाली असून यंदा मुंबई विद्यापीठाने ६५ वे स्थान मिळविण्यात यश मिळविले आहे. मागील वर्षी सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानावर होते.
अभियांत्रिकी संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रात मुंबईच्या आयआयटी बॉम्बेनेच ८५.०८ गुणांची कमाई करत प्रथम स्थान तर देशात तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीटीने अभियांत्रिकी क्षेत्रात राज्यात ५८. ७० गुण मिळवून दुसरे स्थान तर नागपूरच्या विसवेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने राज्यात अभियांत्रिकी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या चेन्नईच्या संस्थेने प्रथम तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने द्वितीय तर नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीच्या शैक्षणिक संस्थेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
विविध विभागातील राज्यातील प्रथम ३ क्रमांकाच्या संस्था
मॅनेजमेंट (कंसात देशातील क्रमवारी / मानांकन )
शैक्षणिक संस्था - गुणांकन
१) आयआयटी बॉम्बे , मुंबई - ६५. ७६ (११)
२)नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मुंबई - ६२. ८७ (१२)
३)एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , मुंबई - ५६. ९३ (१८)
फार्मसी
१)आयसीटी , मुंबई - ७४. ५० (४)
२)एन एम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज , मुंबई - ५७. ८५ (१३)
३)पुना कॉलेज ऑफ फार्मसी , पुणे - ५४. ४४ -(२२)
महाविद्यालये
१)फर्ग्युसन कॉलेज, पुणे - ५६. ०४ (४२)
२)कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन , मुंबई- ५३. ६६ - (६२)
३)सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई - ५१. १४ (९०)
मेडिकल
१)डॉ दि डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे - ५२. ०५ (२४)
२)दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा - ५०. २१ (२९)
३) कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड - ४६. ००(३७)
लॉ
१)सिम्बॉयसिस लॉ स्कुल, पुणे - ५९. ५४ (८)
डेन्टल
१)डॉ डी वाय पाटील विद्यापीठ , पुणे - ७६. ३७(३)
२)नायर हॉस्पिटल डेन्टल कॉलेज , मुंबई - ६४. ५४ (८)
३) दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा- ६०. ९९ (१४)