आयआयटी मुंबईने जिवंत केला मीठ सत्याग्रहाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:09 AM2019-01-31T01:09:58+5:302019-01-31T01:10:12+5:30

कलाकृती उभी करण्यात मोठे योगदान

IIT Bombay revived the history of salt Satyagraha | आयआयटी मुंबईने जिवंत केला मीठ सत्याग्रहाचा इतिहास

आयआयटी मुंबईने जिवंत केला मीठ सत्याग्रहाचा इतिहास

Next

मुंबई : गुजरात येथील दांडी येथे राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे ३० जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. २००५ मध्ये दांडीयात्रेला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधानांनी हे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे पवई येथील आयआयटी, मुंबईने तो इतिहास जिवंत केला आहे. आयआयटी मुंबईतील प्रा. जुसेर वासी आणि प्रा. कीर्ती त्रिवेदी आणि त्यांच्या टीमने ही सर्व कमाल केली आहे. प्रा. वासी यांनी या स्मारकासाठी सौरऊर्जा निर्मितीची गरज कशी पूर्ण करायची याची सर्व योजना बनविली, तर संपूर्ण डिझाइन्स त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली बनविले गेले.

महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला होता. या सत्याग्रहासाठी त्यांनी काढलेल्या दांडीयात्रेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. गांधीजींचा १५ फूट उंच ब्राँझचा पुतळा, दांडीयात्रेत सहभागी झालेल्या ८० लोकांचे पूर्णाकृती पुतळे आणि ती यात्रा डोळ्यांसमोर उभी करणारी २४ भित्तीचित्रे आयआयटीच्या कार्यशाळेत साकारली गेली आहेत. गुजरातच्या दांडी येथील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकात (एनएसएसएम) ती ठेवली गेली आहेत.

आयआयटी मुंबईतील विविध विभागांनी दांडी स्मारकासाठी विविध शिल्पे आणि वास्तू बनविण्यासाठी योगदान दिले आहे. दांडी स्मारकाला वीज पुरविण्यासाठी ४१ सोलार ट्री बनविण्यात आले आहेत. स्मारक पाहायला येणाऱ्या पर्यटकांना मीठ बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी मिठाचा कोंडा बनविण्यात आला आहे. त्यासाठी आयआयटीने धारावीच्या कुंभारवाड्यातील पारंपरिक कलाकार अब्बास गलावनी यांची मदत घेतली आहे. धुळीमुळे शिल्पे खराब होऊ नयेत, म्हणून त्यावर कोटिंग लावण्यासाठी मटेरियल सायन्स अ‍ॅण्ड मेटॅलर्जी विभागाने मदत केली आहे. दांडी यात्रेकरूंची शिल्पे, ४० मीटर उंचीच्या खांबावरील काचेचा भव्य ठोकळा बनविण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरची मदत घेण्यात आली आहे, तसेच सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे योगदान आहे.

Web Title: IIT Bombay revived the history of salt Satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई