Join us

देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाचे (एनआयआरएफ) रँकिंग गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाचे (एनआयआरएफ) रँकिंग गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या (८२.५२) क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती. तर पहिल्या १०० संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील १२ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. मुंबईतील ६, पुण्यातील ४, नागपूर १ आणि वर्धा येथील एका संस्थेचा या १२ संस्थांमध्ये समावेश आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)ने गुरुवारी देशभरातील संस्थांची क्रमवारी ऑनलाइन जाहीर केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून हे रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. विविध विभागनिहाय अशा १० क्षेत्रांत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात आयआयटी बॉम्बेला अभियांत्रिकी विभागात ८५.१६, व्यवस्थापन विभागात ६८.०८ आणि संशोधन विभागात ८०.९३ गुणांकन प्राप्त झाले आहे. अध्यापन, शिकवणी आणि स्रोत, संशोधन, व्यावसायिक दृष्टिकोन, पदवीनंतरचे निकाल असे विविध निकष मानांकनासाठी विचारात घेतले जातात.

मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात घसरण

मुंबई विद्यापीठ मागील वर्षी ४४ गुणांसह ६५ व्या स्थानावर होते मात्र यंदा ४१.५६ गुणांसह मुंबई विद्यापीठाची घसरण ७१ व्या स्थानावर झाली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ १० व्या स्थानावर आहे.

--------------

कोट

विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच करिअरच्या उत्तम संधी आणि त्यासाठीचे सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो. विद्यार्थ्यांच्या औद्योगिक व संशोधन प्रवृत्ती ज्यांचा समाजावर मोठा परिणाम होत असतो त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एनआयआरएफसारख्या मानांकनामुळे आमच्या या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळते.

सुभाषिश चौधरी, संचालक, आयआयटी बॉम्बे

-----------------------

महाराष्ट्रातील पहिल्या १०० मधील संस्था

१) आयआयटी बॉम्बे, मुंबई

२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, पुणे

४) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई

५) होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई

६) विश्वेश्वरैया नॅशनल इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

७) सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे

८) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई

९) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

१०) एनएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्, मुंबई

११) मुंबई विद्यापीठ, मुंबई

१२) दत्त मेघे ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा