Join us

आयआयटी कॅम्पस की मगरींचा अधिवास? पवई तलावातील जलचर प्रदूषणामुळे लोकवस्तीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 06:14 IST

पवई आयआयटी परिसरात रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी मगर आढळून आली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पवई आयआयटी परिसरात रविवारी (दि. २३) रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी मगर आढळून आली. वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली. मात्र रात्रीची वेळ असल्याने वनविभागाच्या पथकाने मदतकार्य करण्याचे टाळले. दुसऱ्या दिवशीपर्यंत मगर पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात गेल्याचे स्पष्ट झाले. निसर्ग अभ्यासकांनी मात्र पवई तलावातील अधिवास संकटात आल्याने मगरी मनुष्य वस्तीमध्ये दाखल होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

पवई तलावातील मगरी आयआयटी किंवा आसपासच्या परिसरात वारंवार आढळून येतात. गेल्या काही वर्षांपासून तलावातील मगरींची संख्या वाढली असून, तेथे होत असलेले बांधकाम, सिमेंट काँक्रीटचा वाढलेला वापर आणि इतर अनेक घटकांमुळे मगरी तलावातून बाहेर येण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे मत वन्यजीव रक्षक सुनिष कुंजू यांनी व्यक्त केले.

मुंबई महापालिका, वनविभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व प्राधिकरणांनी एकत्र येत मगरींच्या अधिवासाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी काम करण्याची गरज आहे.

पालिकेने काय करावे?

पवई तलावाच्या प्रदूषणाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे  मगरीच नाही तर अन्य जलचारांनाही धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून तलावात जलपर्णी वाढणार नाहीत, सिमेंट काँक्रीटचा विळखा बसणार नाही यासाठी पालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून तलावाच्या मध्यभागी असलेले भूभागही नष्ट झाले आहेत. मगरी या आयलंडवर विश्रांती घेत किंवा त्यावर पडून राहत असत. मात्र आता ते नष्ट झाल्याने मगरी काठावर किंवा मनुष्य वस्तीमध्ये येतात, असे अभ्यासकांचे मत आहे.

टॅग्स :आयआयटी मुंबईपोवई नाका