आयआयटीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको
By Admin | Published: March 28, 2015 02:04 AM2015-03-28T02:04:56+5:302015-03-28T02:04:56+5:30
देशातील आयआयटींची स्थापना सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांना त्यांच्या स्वत:च्या पातळीवर काम करू द्यावे.
काकोडकरांची टीका : वाद संचालक निवडीचा
मुंबई : देशातील आयआयटींची स्थापना सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांना त्यांच्या स्वत:च्या पातळीवर काम करू द्यावे. असे झाल्यास या संस्था खूप चांगले काम करतील. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप योग्य नाही, अशी टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी सरकारवर केली़
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या वतीने आयोजित इनोव्हेशन फेस्टिव्हलचे उद्घाटन काकोडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते़
भुवनेश्वर आणि रोपर येथील आयआयटी संचालकांच्या निवडीवरून मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी वाद झाला होता़ त्यामुळे आयआयटी मुंबईच्या गव्हर्नर्स बोर्डाच्या प्रमुख पदाचा व निवड समितीचा काकोडकर यांनी काही दिवसांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला होता. यानंतर प्रथमच काकोडकर यांनी आपली भूमिका मांडली.
आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने आपण आयआयटी मुंबईच्या बोर्ड आॅफ गव्हर्नर्सपदाचा राजीनामा दिला असल्याचे ते म्हणाले.
आयआयटी संचालक निवडीची प्रक्रिया अत्यंत गंभीरपणे हातळणे गरजेचे आहे. तुम्ही एकाच दिवशी ३७ जणांशी बोलून त्यांच्यापैकी एकाची निवड करणे, ही पद्धत अयोग्य असल्याचे काकोडकर म्हणाले.