IIT Kanpur: आयआयटी कानपूरसाठी माजी विद्यार्थ्याकडून 100 कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:15 PM2022-04-05T15:15:21+5:302022-04-05T15:16:39+5:30
सन 1984 मध्ये युनायटेड एअरलाईन्समध्ये व्यवस्थापक, रणनिती सल्लागार म्हणून राकेश यांनी काम पाहिले.
मुंबई - इंडिगो एअरलाईन्सचे सह-संस्थापक आणि अमेरिकन अब्जाधीश उद्योजक राकेश गंगवाल यांनी भारतीय औद्योगिक संस्थान (आयआयटी) कानपूरला 100 कोटी रुपये दिले आहेत. स्कूल ऑफ मेडिकल सायन्स टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी मदतनिधी म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही रक्कम संस्थेला देण्यात आली. राकेश हे आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत.
कोलकाताचे मूळ रहिवाशी असलेले राकेश गंगवाल यांनी शालेय शिक्षण डान बास्को स्कूल कोलकाता येथे पूर्ण केले. तर, 1975 मध्ये आयआयटी कानपूर येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. बीटेक केल्यानंतर पेंसिल्वेनिया विश्वविद्यालयाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण होताच ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेथील नागरिकताही त्यांनी घेतली. आयआयटी प्रशासनाच्या माहितीनुसार, एअरलाईन उद्योगाशी राकेश गंगवाल हे 1980 मध्ये जोडले गेले. सर्वप्रथम ते बूज एलन अँड हॅमिल्टन अमेरिकी कंपनीमध्ये सहयोगी म्हणून कार्यरत राहिले. त्यानतंर, यूनाइटेड एयरलाइंसमध्ये त्यांनी काम केलं.
सन 1984 मध्ये युनायटेड एअरलाईन्समध्ये व्यवस्थापक, रणनिती सल्लागार म्हणून राकेश यांनी काम पाहिले. आयआयटीचे कानपूरचे प्रमुख प्रो. अभय करंदीकर यांनी म्हटले की, राकेश यांच्याकडून कॉलेजमधील स्कूल ऑफ मेडिकल रिसर्च अँड टेक्नॉलॉजी विभागात नवीन शोध कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही मदत देण्यात येत आहे. दरम्यान, राकेश गंगवाल हे इंडिगो एअरलाईन्सचे सह-संस्थापक असल्यासोबतच त्यांच्याकडे 37 टक्के भागिदारीही आहे. यापूर्वी ते युएस एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षही राहिले आहेत.