मुंबई आयआयटीने केले ४० संशोधन प्रकल्प! १३ संशोधनांना परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 04:49 AM2020-10-27T04:49:13+5:302020-10-27T07:31:34+5:30
IIT Mumbai : कोविडकाळात निर्मिती केलेल्या आयआयटी मुंबईच्या १३ संशोधनांना २२ कंपन्यांकडून आतापर्यंत परवाने मिळाले. ड्युराप्रोट या मास्कची निर्मिती करण्यात आली असून ई-कॉमर्स संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : काेराेना संकटावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे संशाेधन सुरू आहेे. याच पार्श्वभूमीवर ४०हून अधिक प्रकल्पांचे काम आयआयटी मुंबईच्या संशोधन व विकास विभागाने हाती घेतले आहे. १३ संशाेधनांना परवाना मिळाला आहे. काही सध्या विविध रुग्णालये, उद्योगात वापरात असून काही बाजारात उपलब्ध आहेत, तर काहींची परवानगी प्रक्रिया सुरू आहे.
कोविडकाळात निर्मिती केलेल्या आयआयटी मुंबईच्या १३ संशोधनांना २२ कंपन्यांकडून आतापर्यंत परवाने मिळाले. ड्युराप्रोट या मास्कची निर्मिती करण्यात आली असून ई-कॉमर्स संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. यूव्हीसी बेस्ड पोर्टेबल सॅनिटायझेशन युनिट्सलाही परवाना मिळाला आहे.
सॅनिटायझेशन, वैद्यकीय उपकरणे, वैयक्तिक सुरक्षितता, अँटिव्हायरल औषधे, आयटी सोल्युशन्स, डायग्नोस्टिक अप्रोचद्वारे ४०हून अधिक प्रकल्पांची निर्मिती आयआयटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाने केली. हॅन्डरब सॅनिटायझर्स, सर्फेस स्प्रे, बायोडिग्रेडेबल फेस शिल्ड्स, कोविड माइल्ड पेशंटसाठी हेल्मेट, श्वासोच्छ्वासाचा त्रास असणाऱ्यांसाठी अंबू बॅग्स, ॲडव्हान्स्ड व्हेंटिलेटर्स, आयसीयू व्हेंटिलेटर्स अशा प्रकल्पांवर चाचणीनंतरची प्रक्रिया करण्यात येत आहे. ओडिशा व मेघालय येथे वापरण्यात येणारे व क्वारंटाइन लोकांसाठी तयार केलेले क्वारंटाइन ॲप, लक्षणे असलेल्या, नसलेल्या लोकांचा मागोवा घेणारे सेफ ॲप आदी आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून संशाेधनाअंती तयार केले आहेत.
संशोधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात काेविड काळात समाजासाठी मैलाचा दगड ठरू शकतील अशा प्रकल्पांची, उत्पादनांची निर्मिती प्रयाेगशाळेत करण्याचा आयआयटी मुंबईतील संशोधन व विकास विभागाचा प्रयत्न आहे.
- प्रा मिलिंद अत्रे, डीन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आयआयटी, मुंबई