मुंबई : अभ्यासक्रमनिहाय जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आयआयटी मुंबईने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयात देशात अव्वल तर जगात ४७ वा क्रमांक पटकावला आहे. जागतिक विद्यापीठांची क्रमवारी क्यूएस रँकिंग बुधवारी जाहीर झाली असून, २०२३ या वर्षातील कोणती विद्यापीठे, शैक्षणिक संस्था कोणत्या अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करत आहेत, याची क्रमवारी जाहीर करण्यात आली. १०० पैकी ८०.४ गुणांसह आयआयटी मुंबईने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मागील वर्षीपेक्षा शैक्षणिक संस्थेच्या क्रमवारीत १८ स्थानांनी सुधारणा झाली आहे. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीसह नॅचरल सायन्स, सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट, आर्टस् अँड ह्युमॅनिटीज या अभ्यासक्रमात ही उत्तम कामगिरी आयआयटी मुंबईने केली आहे.क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ही जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित रँकिंग प्रणाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आयआयटी मुंबईने सातत्याने या क्रमवारीत वरच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे.
आर्टस् अँड डिझाईन, सिव्हिल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी आयआयटी मुंबईची क्रमवारी जागतिक पातळीवर ५१ ते १०० च्या दरम्यान आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी संस्थेला ६६, केमिकल इंजिनिअरिंगसाठी ७७, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी ५४, मेकॅनिकल इंजिनिरिंगसाठी ६८, तर मिनरल्स अँड मायनिंगसाठी ३७ व्या स्थानाची क्रमवारी प्राप्त झाली आहे.
यापुढेही आम्ही सातत्याने प्रयत्न करूजगात आणि प्रामुख्याने भारतातील अभियांत्रिकी शिक्षणात प्रमुख शैक्षणिक संस्था म्हणून आयआयटी मुंबई मुख्य जबाबदारी पार पडत असल्याचा आम्हाला आनंद आहे. भारताची उच्च शिक्षणाची जगातील कामगिरी अधोरेखित करण्यासाठी यापुढेही आम्ही सातत्याने प्रयत्न नक्कीच करत राहणार आहोत. क्यूएस रँकिंगमध्ये मिळालेल्या या यशासाठी फक्त प्राचार्य, शिक्षक यांचाच नाही तर विद्यार्थ्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.- शुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई