अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर, राज्यातील ७ शिक्षण संस्थांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:13 AM2021-12-30T06:13:31+5:302021-12-30T06:15:19+5:30
IIT Mumbai : देशातील तब्बल १ हजार ४३८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी देशपातळीवरील या कामगिरीत सहभाग दर्शविला होता.
मुंबई : अटल रँकिंग इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन अचिव्हमेंट्स या राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्रातील ७ शैक्षणिक संस्थांनी विविध विभागांमध्ये यश प्राप्त केले आहे. त्यात देशातील महत्त्वपूर्ण केंद्रीय संस्थांच्या (तंत्रशिक्षण) यादीत मुंबईच्या आयआयटी मुंबईने देशात दुसरे तर राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
देशातील तब्बल १ हजार ४३८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी देशपातळीवरील या कामगिरीत सहभाग दर्शविला होता. आयआयटी मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळविला असून पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकाविला आहे. सन २०१९ आणि २०२० या वर्षांत सार्वजनिक अनुदानित शैक्षणिक संस्था या विभागात आयआयटी मुंबईला दुसरे स्थान मिळत होते.
तर यंदाच्या अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईसह, मुंबईच्या व्हीजेटीआय, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तसेच सिम्बॉयसिस इंटरनॅशनल आणि रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अशा शैक्षणिक संस्थांनी पहिल्या दहामध्ये विविध विभागांत बाजी मारली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स (तंत्रज्ञान)
- आयआयटी मुंबई - देशात दुसरा क्रमांक
राज्य / अभिमत विद्यापीठे (तंत्रज्ञान)
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी - देशात सहावा क्रमांक
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - देशात आठवा क्रमांक
शासकीय महाविद्यालय /
शैक्षणिक संस्था (तंत्रज्ञान)
- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल - देशात १० क्रमांक
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे - देशात पहिले
- वीरमाता जीआजोबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट - देशात ५ क्रमांक
- जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग - देशात पहिले
उच्चशिक्षणात संशोधन महत्त्वाचे
आजच्या शैक्षणिक संस्थांमधील उच्चशिक्षणात संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. स्वयंउद्यमी आणि संशोधनासाठी परिपक्व असे वातावरण आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रशासन नेहमीच पूर्ण प्रयत्न करत असते. आम्ही संस्थेला मिळालेल्या या यशाने निश्चित आनंदी आहोत. मात्र, तरीही याहून संस्थेची कामगिरी अधिक उत्तम असेल असा आमचा प्रयत्न असणार आहे.
- सुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई