IIT मुंबईत आणखी ४ हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार; नव्याने २० इमारती बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:08 PM2024-10-25T14:08:33+5:302024-10-25T14:08:49+5:30

२००० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद

IIT Mumbai to set up hostels for another 4,000 students; 20 new buildings will be constructed | IIT मुंबईत आणखी ४ हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार; नव्याने २० इमारती बांधणार

IIT मुंबईत आणखी ४ हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार; नव्याने २० इमारती बांधणार

मुंबई: आयआयटी मुंबईतील विद्यार्थीसंख्या आता १३ हजारांवरून १६ हजारांपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबई प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी, तसेच सध्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबईत तब्बल २००० कोटी खर्चून २० नव्या इमारतींची उभारणी केली जाणार आहे.  त्यातील वसतिगृहाच्या इमारतींमध्ये नव्याने ४ हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. या इमारती १० मजली आणि ४५ मीटर उंचीच्या असतील, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी दिली.

सध्या आयआयटी मुंबईत जवळपास १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आयआयटीमध्ये १२ हजार विद्यार्थ्यांसाठीच वसतिगृहाच्या सुविधा उपलब्ध आहेत. नव्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी संख्येत आणखी वाढीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या जुलै महिन्यापर्यंत आणखी २ हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच पुढील तीन वर्षात त्याच क्षमतेच्या आणखी एक वसतिगृह उभारले जाईल, यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आयआयटी मुंबईत एकाचवेळी १६ हजार विद्यार्थी वास्तव्य करू शकणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

बांधकाम क्षेत्र १६ लाख चौरस मीटरपर्यंत विस्तारणार

शैक्षणिक इमारतीसाठीच्या उंचीच्या बंधनामुळे सध्या आयआयटी मुंबईत अधिकतम ३० मीटर उंचीच्या इमारती आहेत. मात्र आता ४५ मीटरपर्यंत इमारती उभारणीची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सर्व सुविधांनी सुसज्ज २० इमारती उभारल्या जात आहेत. यामध्ये शैक्षणिक संकुले, कर्मचारी निवासस्थाने, वसतिगृह आदींचा समावेश आहे. आयआयटीत सध्या सर्व इमारतींचे मिळून ९ लाख चौरस मीटर एवढे असलेले बांधकाम क्षेत्र वाढून १६ लाख चौरस मीटरपर्यंत जाईल, अशी माहिती फायनान्स, पायाभूत सुविधा विभागाचे उपसंचालक प्रा. के. व्ही. कृष्ण राव यांनी दिली.

माजी विद्यार्थ्यांशी संवाद

आयआयटीत अल्युमिनी सेंटरची उभारणी केली जाणार आहे. यातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सोपे जाणार आहे. या केंद्रामार्फत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title: IIT Mumbai to set up hostels for another 4,000 students; 20 new buildings will be constructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.